Friday, July 19, 2024
Homeदेशपुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

रुद्रपुर : आपण भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची गॅरंटी दिली आहे. आता तिसऱ्या टर्ममध्ये आपल्याला मागच्या १० वर्षांहून आणखी एक मोठे काम करणार आहे. आपल्याला २४ तास वीज मिळावी, वीज बील शून्य व्हावे आणि वीजेपासून आपली कमाईही व्हावी, असे माझे लक्ष्य आहे. तसेच, पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही तर, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस के शहजादे’ म्हणत राहुल गांधींवरही हल्ला चढवला. ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे एका रॅलीला संबोधित करत होते. सरकारचा हेतू योग्य असेल, तर निकालही योग्यच मिळतात. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आल्यास आगपाखड होईल, अशी घोषणा काँग्रेसच्या राजघराण्यातील राजपुत्राने केली आहे. ६० वर्षे देशावर राज्य करणारी व्यक्ती १० वर्षे सत्तेबाहेर का राहिली? असा प्रश्न मोदींनी यावेळी उपस्थित केला आहे.

छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुढाकार

मोदी म्हणाले, आपण पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. यामध्ये छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार मदत करत आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाला ३०० युनिट वीज लागते. ही वीज मोफत मिळेल, अधिक वीज तयार झाल्यास, सरकार विकत घेईल आणि तुमची कमाईही होईल. यानंतर पंतप्रधान थोडे थांबले आणि त्यांनी जनतेला विचारताना, आपण झीरो बिल योजनेचा लाभ घेणार का? त्यासाठी अॅप्लीकेशन करण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती दिली.

जनादेशाविरोधात लोकांना भडकावण्याचे काँग्रेसचे काम

आज रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले, त्यांना निवडून-निवडून साफ करा. यावेळी त्यांना मैदानात थांबू देऊ नका. आणीबाणीची मानसिकता असलेल्या काँग्रेसचा आता लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही. यामुळे आता ते जनादेशाविरोधात लोकांना भडकावण्याच्या कामात लागले आहेत. भारताला अस्थिरतेकडे घेऊन जाण्याची काँग्रेसची इच्छा आहे. कर्नाटकातील एका मोठ्या काँग्रेस नेत्याने देशाचे तुकडे करण्याची भाषा केली. त्याला शिक्षा देण्याऐवजी काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट दिले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

काँग्रेस घुसखोरांना प्राधान्य देते

यावेळी मोदींनी दिवंगत बिपीन रावत यांचाही उल्लेख केला. काँग्रेसने दिवंगत बिपीन रावत यांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नाही तर, काँग्रेस घुसखोरांना प्रोत्साहन देते आणि जेव्हा भाजप सीएएच्या माध्यमाने नागरिकत्व देते, तेव्हा काँग्रेस विरोध करते, असेही मोदी म्हणाले.

प्रत्येक भ्रष्टाचाऱ्यावर होणार कारवाई

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, तामिळनाडूजवळ एक कच्चाथीवू बेट आहे. ते बेट भारताचा भाग होते, पण काँग्रेसने ते श्रीलंकेला दिले. ज्या काँग्रेसचे नेते देशाचे तुकडे करून कच्चाथीवूच्या हाती सोपवण्याच्या गप्पा मारतात ते देशाचे रक्षण करू शकतात का? मी म्हणतो- भ्रष्टाचार हटवा. ते म्हणतात- भ्रष्टाचारी वाचवा. पण, त्यांच्या शिव्या आणि धमक्यांना मोदी घाबरत नाहीत. प्रत्येक भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी पंतप्रधान म्हणाले.

१० वर्षात देशाचा सर्वाधिक विकास

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, मोदींनी भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याची हमी दिली आहे. तिसरी सर्वात मोठी आर्थिक ताकद म्हणजे लोकांचे उत्पन्न वाढेल. नोकरीच्या संधी वाढतील. खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये सुविधा वाढतील.आपल्याला उत्तराखंडचा विकास करायचा आहे. केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. १० वर्षात जेवढा विकास झाला तेवढा आजपर्यंत झालेला नसल्याचे मोदी यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -