Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीमालमत्ता करातून पालिका मालामाल

मालमत्ता करातून पालिका मालामाल

२०२३-२०२४ या वित्तीय वर्षात ३ हजार १९५ कोटींचे संकलन

मुंबई : पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रुपये इतके संकलन करण्यात आले आहे.

मुंबई शहरातील नागरिकांना पालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येतात. या अनुषंगाने ‘मालमत्ता कर’ हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. हा ‘मालमत्ता कर’ नागरिकांनी वेळेत पालिकेकडे भरणा करावा, यासाठी पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने वर्षभर प्रयत्न केले आहेत. परिणामी, दिनांक ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराची वसुली ही ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये इतकी झाली आहे.

करनिर्धारण व संकलन विभागातर्फे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर निर्धारित कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आले. निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आली. मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच, मागील थकबाकी वसुलीसाठी परिश्रम घेण्यात आले. परिणामी, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपये, दिनांक २८ मार्च २०२४ रोजी ३०४ कोटी रुपये, दिनांक २९ मार्च २०२४ रोजी १७१ कोटी रुपये, दिनांक ३० मार्च २०२४ रोजी १७१ कोटी रुपये आणि दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी १९० कोटी ३४ लाख रुपयांचे विक्रमी संकलन करण्यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले.

दिनांक १ एप्रिल, २०२३ ते ३१ मार्च, २०२४ या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक मालमत्ता कर संकलन हे ‘एच पूर्व’ विभागामध्ये रुपये ३३६.४५ कोटी इतके झाले आहे. त्या खालोखाल ‘के पूर्व’ विभागामध्ये ३१७.४८ कोटी रुपये इतकी, ‘जी दक्षिण’ विभागामध्ये २५७.११ कोटी रुपये मालमत्ता कर संकलन झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही भागातील मालमत्ता कर संकलनाचा विचार केल्यास सर्वाधिक कर संकलन हे पश्चिम उपनगरांमध्ये १,५९०.०९ कोटी रुपये, शहर भागात ९१७.०५ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरांमध्ये ६७८.४२ कोटी रुपये इतके मालमत्ता कर संकलन झाले आहे.

२ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ताधारक

पालिका हद्दीत एकूण मालमत्तांची संख्या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्या ३ लाख ५६ हजार ६५२ इतकी आहे. तर, उर्वरित ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्तांना कर आकारणी केली जाते. सन २०२३-२४ मध्ये २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ता धारकांनी मिळून एकूण वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपयांचा कर भरणा केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -