Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडीएकाच महिन्यात २ हजार ४२५ कोटी रूपयांचे मालमत्ता कर संकलन

एकाच महिन्यात २ हजार ४२५ कोटी रूपयांचे मालमत्ता कर संकलन

मुंबई महापालिकेची मार्च महिन्यात विक्रमी कामगिरी

मुंबई (प्रतिनिधी) : महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत ३ हजार १९६ कोटी रूपयांचा मालमत्ता कर संकलित केला. १ मार्च ते ३१ मार्च या एकाच महिन्यात तब्बल २ हजार ४२५ कोटी रूपयांचा महसूल गोळा करत विक्रमी कामगिरी केली. महापालिकेच्या इतिहासातील मार्च महिन्यातील मालमत्ताकर वसुलीची ही उच्चांकी रक्कम आहे. सन २०२३-२४ मध्ये निर्गमित केलेल्या सुधारित कर देयकांचा अंतिम दिनांक २५ मे आहे. अनेक मालमत्ताधारकांनी २५ मे या देय दिनांकापूर्वी कर भरण्याचे आश्वासित केले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये संकलित होणारा मालमत्ताकर हा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील उद्दिष्टांचाच भाग असणार आहे .

पालिका हद्दीत एकूण मालमत्तांची संख्या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती व निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्या ३ लाख ५६ हजार ६५२ इतकी आहे. एकंदरीतच ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्ताकर आकारणी कक्षात येतात. सन २०२३-२४ मध्ये २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ताधारकांनी मिळून ३ हजार १९७ कोटी ३३ लाख रूपयांचा कर भरणा केला आहे. उर्वरित ३ लाख ४४ हजार ७८१ मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरणा केलेला नाही. त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

अधिनियमातील कायदेशीर तरतुदीनुसार, मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देणे अनिवार्य आहे. त्यानुसार, सन २०२३-२०२४ चा मालमत्ता कर भरण्याचा अंतिम कालावधी दिनांक २५ मे २०२४ पर्यंत आहे. तसेच, उद्दिष्टपूर्तीसाठी करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. एवढेच नव्हे तर मागील थकबाकी वसुलीसाठी देखील प्राधान्य देण्यात येत आहे. अनेक मालमत्ताधारकांनी देय दिनांक २५ मे पूर्वी कर भरण्याचे प्रशासनाला आश्वासित केले आहे.

मालमत्ताकर संकलनाची गत तीन वर्षांची मार्चमधील तुलनात्मक आकडेवारी

सन २०२०-२१ : ७३० कोटी रूपये
सन २०२१-२२ : १ हजार ३८८ कोटी रूपये
सन २०२२-२३ : १ हजार १७९ कोटी रूपये
सन २०२३-२४ : २ हजार ४२५ कोटी रूपये

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -