पिंपरी : उन्हाचा कडाका वाढल्याने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पुण्याच्या मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. आज या धरणात ४४.७२ टक्के इतका उपलब्ध पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास मागील साडेचार वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या नागरिकांना आणखी पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एप्रिल महिना सुरू झाला असून, उन्हाळा तीव्र होत चालला आहे. उन्हाचा पारा चाळिशीपार होऊ लागला आहे. उन्हाच्या झळा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाष्पीभवनामुळे पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणात आजमितीला ४४.७२ टक्के पाणीसाठा आहे. वाढत्या उन्हाबरोबरच पाण्याची मागणी वाढली आहे. पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
शहराला मुख्यतः मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात आजमितीला ४४.७२ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गतवर्षी ४६.३७ टक्के साठा होता. गतवर्षीपेक्षा १.६५ टक्क्याने कमी असून, पाण्याची मागणी वाढली आहे. त्याकारणाने पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल का असा प्रश्न उद्भवत आहे.