केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर सडकून टीका
मुंबई : ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमच्या पक्षावर, आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या भाषेत टीका केली. ते म्हणाले की भाजपला तडीपार करा. आमची सत्ता केंद्रात, राज्यात दोन्ही कडे आहे. तडीपार करायचं असेल तर आम्ही कोरोना काळात लोकांचे पैसे खाणाऱ्याला करु’, असा जोरदार टोला केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. देशाच्या पंतप्रधानांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत खडे बोल सुनावले. तसंच सामनातून अत्यंत बेताल वक्तव्य करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही सडकून टीका केली.
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतो माहित नाही. त्याची मानसिक स्थिती बिघडली आहे. मी कोणाला अरे तुरे करत नाही, पण याला करणार. कारण ज्याची पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी नाही तो थेट तडीपारची भाषा कशी काय करतो? केवळ देशातच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे याची त्याने माहिती घ्यावी, केवळ सामना वाचू नये, केवळ बंडलबाज संपादकाचे लेख वाचू नकोस, असा खोचक टोलाही नारायण राणे यांनी संजय राऊतांना लगावला.
कोरोना काळात सामनाला करोडो रुपयांचा नफा झाला
उद्धव ठाकरेंना उद्देशून नारायण राणे म्हणाले, भाजपा भ्रष्ट पक्ष आहे अशी टीका त्याने केली. पण हा स्वतः काय बिझनेस करतो? कुठून येतो पैसा? कोरोनामध्ये सगळे प्रिंट बंद पडले होते. पण त्या काळात सामनाला करोडो रुपयांचा नफा झाला. हा काळा पैसा पांढरा नाही केला? त्याची चौकशी होणार. त्यामुळे तुला पंतप्रधानांवर बोलायचे नैतिक अधिकार नाहीत, असं नारायण राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेमध्ये काडीभरही दानत नाही
मोदींच्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी गरिबांना खूप मदत केली. त्यांनी सुरु केलेली मोफत धान्याची योजना आजही सुरु आहे. तू कोणाला पाच पैशांची तरी मदत करतोस का? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आमच्याबरोबर कधी देवळात आला तरी दान म्हणून त्याने कधीच पाच किंवा दहा रुपयेही दिले नाहीत. त्याची तेवढी दानतच नाही. आणि हा भाजपाला भ्रष्ट पक्ष म्हणतो? अशी टीका नारायण राणे यांनी केली.
अशी परतफेड अशी करु नकोस
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना मणिपूर आणि लडाखला जायचे सल्ले देतो. पण फडणवीस नुकतेच लडाखला जाऊन आले. माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस राज्यात, देशात पक्ष जिथे सांगेल तिथे लगेच जातात. पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनीच तुला सांभाळलं त्यामुळे त्याची परतफेड अशी करु नकोस, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला.
बाळासाहेबांच्या ‘त्या’ शब्दामुळे मी शांत
मी फडणवीसांना सांगत होतो की हा ठाकरे असला तरी साप आहे, कधीही उलटा फिरतो. मी हे अनेक वेळा पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे रुद्राक्षमाळ घालायचे. पण ते गेल्यानंतर उद्धव ठाकरेने त्यातली रुद्राक्षमाळ घेतली आणि फेकून दिली. साहेबांच्या नावाने हा पक्ष चालवतो, हे त्याचं प्रेम आहे का? मला मातोश्रीच्या अनेक गोष्टी माहित आहेत पण साहेबांखातर त्या मी सांगत नाहीत. त्यांनी माझ्याकडून शब्द घेतला होता की उद्धवबद्दल वाईट विचार करु नकोस, मी म्हणालो ठाकरे नावाच्या कुठल्याच माणसाकडे मी वाकड्या नजरेने पाहणार नाही, म्हणून मी शांत आहे, असं नारायण राणे म्हणाले.