बंगळूरु : राहुल गांधी संसदेत म्हणायचे की, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवू नका, रक्ताच्या नद्या वाहतील. पण, आमच्या सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवले. राहुल बाबा, आता रक्ताच्या नद्या सोडा, तिकडे दगड फेकण्याचीही कुणाची हिम्मत होत नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भक्कम नेतृत्वात लढत आहोत, तर दुसरीकडे घराणेशाही असलेली भ्रष्ट इंडीया आघाडी असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडी, राहूल गांधींसह काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख नेते देशभरात विविध ठिकाणी सभा, कार्यक्रम घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी बंगळुरुमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, कर्नाटकात भाजप सर्व २८ जागा जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी शाह यांनी राहुल गांधींच्या परदैश दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले, ‘संपूर्ण जगात नरेंद्र मोदी एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी २३ वर्षांपासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असताना एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र जनतेची सेवा केली आहे. तर दुसरीकडे राहुल बाबा आहेत. हे दर उन्हाळ्यात परदेशात फिरायला जातात आणि इकडे काँग्रेसवाले सहा महिने त्यांना शोधत बसतात.’
एका बाजूला नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी २३ वर्षे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम केले. २३ वर्षात विरोधकांना मोदींवर २५ पैशांचाही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. २३ वर्षांपासून मोदींनी पारदर्शकतेचा आदर्श देशात ठेवला आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराची ही ‘अहंकारी’ आघाडी आहे. काँग्रेसने सोनिया-मनमोहन यांच्या काळात १२ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.