भारतीय नववर्ष स्वागत यात्रा, डोंबिवली

Share

सेवाव्रती: शिबानी जोशी

गुढीपाडवा लवकरच येऊ घातला आहे. खरंतर भारतीय संस्कृतीतील हा नववर्षारंभाचा दिवस विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तरीसुद्धा युवा पिढीमध्ये ३१ डिसेंबर या आंग्लवर्षाच्या शेवटच्या दिवसाची आणि नववर्ष पहिल्या दिवसाची न्यू इयर म्हणून साजरा करण्याची पद्धत काही वर्षांत आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर रूढ झाली. तरुणाई या दिवशी मद्य, रात्रीचा संचार आणि पार्टी या पलीकडे नववर्षाच्या आरंभाची कल्पनाच विसरून गेले की काय? असा प्रश्न पडू लागला होता.

विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणातून अशा रीतीने हे नववर्ष स्वागत  तरुण पिढी कधी करू लागली हे आपलं आपल्यालाच कळल नाही. पण डोंबिवलीतील काही कार्यकर्त्यांना मात्र ते जाणवले; परंतु दुसऱ्या संस्कृतीला नाव न ठेवता आपल्या संस्कृतीचे जतन, संवर्धन करून तरुणांपुढे ती ठेवणं हाच त्यावरचा चांगला उपाय असू शकतो हे डोंबिवलीतल्या आबासाहेब पटवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात आले. दुसऱ्याला कमी न लेखता त्याच्या रेषेसमोर आपली आणखी मोठी रेषा आखायची हेच आपल्या संस्कृतीत देखील सांगितलेलं आहे. त्यालाच अनुसरून याला पर्यायी, सकारात्मक व रचनात्मक उपाय नववर्ष स्वागत यात्रेच्या रूपान डोंबिवलीत २६ वर्षांपूर्वी सुरू झाला. तो म्हणजे नववर्ष स्वागत यात्रा.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंती सध्या यंदा सुरू आहे. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं “दहा हजार वर्षांत अशी गोष्ट होणे नाही.” हे वाक्य ज्याला तंतोतंत लागू होतं अशी भव्य-दिव्य शोभायात्रा पाडव्याच्या दिवशी काढण्याचं ठरलं. ही शोभायात्रा डोंबिवलीत सर्वात प्रथम निघाली.

वर्ष प्रतिपदा युगाब्द ५१०१ गुढीपाडवा, गुरुवार दि. १८ मार्च १९९९ या दिवशी डोंबिवली शहराने एक विलक्षण, विस्मयकारक आणि आजवर कधीही, कुठेही न घडलेली  “भारतीय नव वर्ष स्वागत यात्रा”  अनुभवली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. आता गेली सलग २५ वर्षे सातत्याने सुरू आहे. पहिल्या वर्षापासूनच या शोभायात्रेला डोंबिवलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. शोभायात्रा आणि त्या आधीचे सात दिवस यानिमित्ताने चालणाऱ्या विविध उपक्रमात एक लाखाहून अधिक डोंबिवलीकर सहभागी होतात, त्यानिमित्ताने एकत्र येतात आणि आपल्या हिंदू संस्कृतीच्या या उत्सवांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची नजर त्यांना मिळते. आज २५ वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच अन्य प्रांतांतील काही शहरांत वाढत्या उत्साहात त्याचे अनुकरणही होत आहे.

या शोभायात्रेला इतकं मोठं यश पहिल्या वर्षीपासून का मिळाले? याचे उत्तर म्हणजे समाजातल्या सर्व स्तरातल्या, सर्व वर्गातल्या, सर्व धर्मातल्या लोकांना एकत्रित आणण्याचे काम या शोभायात्रेमुळे घडलं आणि त्यामुळे प्रत्येकाला  स्वागत यात्रा आपली वाटू लागली. सर्व समावेशकता, सात्त्विकता आणि भव्यता या वैशिष्ट्यांमध्येच स्वागत यात्रेचे यश दडलेले आहे. आबासाहेब पटवारी, नाना कानेटकर, अप्पा चक्रदेव, सुधीर जोगळेकर, वैद्य, वेलणकर यांच्यासारखे डोंबिवलीतील ज्येष्ठ, विचारवंत यांनी एकत्र येऊन अशा प्रकारची नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची सव्वीस वर्षांपूर्वी योजना आखली आणि पहिल्या वर्षीपासूनच त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. एवढ्या मोठ्या शोभायात्रेची आखणी करणे हे एकट्या दुकट्याचं काम नाही. त्यामुळे डोंबिवलीतील सुप्रसिद्ध गणेश मंदिराच्या व्यवस्थापनामार्फत ही शोभायात्रा पहिल्या वर्षापासून काढली जाते.

आज आबासाहेब पटवारी नाहीत; परंतु त्यांनी ही शोभायात्रा कधीही बंद करू नका. या शोभायात्रामुळेच भविष्यातील पुढच्या पिढ्यांना आपली संस्कृती आपल्याच शहरात स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येईल आणि एक खूप मोठं समाजकार्य तुम्ही करत राहाल असे सांगितलं होतं आणि ते खरोखरंच घडत आहे. त्याशिवाय पाडव्याच्या पूर्वसंध्येला संभाजी महाराज बलिदान दिन असतो. त्यामुळे पहिल्या वर्षापासूनच संभाजी महाराज बलिदान दिवस आदल्या दिवशी साजरा करून दुसऱ्या दिवशी शोभायात्रा काढायचा हा पायंडा गेली २६ वर्षं डोंबिवली स्वागत यात्रा समितीकडून पाळला जातोय. ज्या संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं, त्यांची आठवण काढूनच या शोभायात्रेला सुरुवात होत असते. यावेळी शाळा-कॉलेजातील विद्यार्थी  पथकांमार्फत ढोल ताशे, लेझीम, दांडपट्टा याची प्रात्यक्षिकं करतात तसेच एखाद्या सुप्रसिद्ध वक्त्याचे भाषण त्यांच्यासाठी ठेवले जाते.

डोंबिवली येथील प्रत्येक नागरिकाला शोभायात्रेमुळे पाडव्यासारखे सण आणि त्या आधी सात दिवस होणाऱ्या सामाजिक कार्याचा सुद्धा त्याला लाभ मिळतो. शोभायात्रेच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी सुद्धा केली जाते. पटवारी यांचे म्हणणे होते की,  लहान मुलांना लहान वयातच ही आतषबाजी पाहायला मिळाली, तर ते पुढे आयुष्यभर जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी मनात या स्मृती आठवू शकतील. आतषबाजीचं वैशिष्ट्य हे की ती बिन आवाजाच्या फटाक्यांची केली जाते.

पाडव्याच्या दिवशी पहाटे शंभर वर्षं जुन्या गणेश मंदिरात पहाटे ५ वाजता गणपतीची पूजा होते. त्यानंतर नवीन वर्षाचे पंचांग वाचन केले जाते. हा अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणायला हवा. कारण जमलेल्या नागरिकांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच संपूर्ण वर्षाचे पंचांग त्यामुळे कळतं. पंचांग वाचन झाल्यानंतर मंदिरात गुढी उभारली जाते व शोभायात्रेला सुरुवात होते. शोभायात्रा डोंबिवली पश्चिमेकडे गेल्यानंतर डोंबिवलीतील डॉक्टर, वकील, कलाकार, लेखक अशा सर्व प्रतिष्ठित मंडळींना एकत्रित बोलवून चहापान आणि भेटीगाठींचा कार्यक्रम होतो. हेतू हाच की त्यानिमित्ताने डोंबिवलीतील सर्व मान्यवरांनी एकमेकांशी संवाद साधावा. त्यानंतरही रामाचं नवरात्र येतं म्हणून शोभायात्रेचे कार्यक्रम न संपता गुढीपाडवा ते रामनवमी २४ तास अखंड रामनाम गणेश मंदिरात सुरू असते आणि  गेली २६ वर्षं त्यात खंड पडलेला नाही.

सात दिवस आधी सुरू असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये स्त्रीसूक्ताचं सामुदायिक पठण, गणपती अथर्वशीर्ष सामुदायिक पठण केले जाते. यात हजारो महिला, पुरुष सहभागी होत असतात. गणपती अथर्वशीर्ष पठणाच्या वेळी १८ पगड जातीतील जोडप्यांना बोलावून त्यांच्या हस्ते गणपतीवर अभिषेक केला जातो. त्याशिवाय भजनी मंडळ स्पर्धा, मुलांसाठी अंताक्षरी स्पर्धा, युवकांसाठी स्पर्धा घेतल्या जातात आणि या ठिकाणी एखाद्या थोर व्यक्तीचं भाषण होत असते. करवीर पीठाचे शंकराचार्य, स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प्रज्ञावंत स्वामी, साध्वी ऋतंबरा, दत्ताजी ताम्हणे, ललित महाराज अशी मोठमोठी माणसं हिंदू संस्कृतीवर विचार ऐकवून गेली आहेत. गेल्या दोन वर्षांत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली होती.

शोभायात्रा म्हणजे फक्त मिरवणूक नसते तर त्यातही दरवर्षी एक सामाजिक संदेश दिला जातो आणि त्या विषयावरच आधारित  पथक आपले कार्यक्रम दाखवतात. यापूर्वी पर्यावरण, देहदान, नेत्रदान, पाणी वाचवा असे सामाजिक विषय घेतले गेले होते. यावर्षी रामराज्यची संकल्पना आणि नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार असे दोन विषय घेतले आहेत. पहिल्याच वर्षी अन्नकोट आयोजित केला होता. त्याला महिला-पुरुष सर्वच नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता म्हणजे इतकी फळं मिळाली होती की शेवटी इतर फुला पानांच्या रांगोळ्यांबरोबर फळांच्या रांगोळ्याही घातल्या गेल्या होत्या. या सर्व कार्यक्रमांमध्ये डोंबिवलीतील सर्व आध्यात्मिक आणि धार्मिक संप्रदाय, सर्व ज्ञाती संस्था, सर्व सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, व्यसनमुक्ती, कला, क्रीडा, नाट्य, साहित्यविषयक संस्था, व्यापारी, शहरातील सर्व मंदिरांचे प्रतिनिधी, सर्व भाषिक भजनी मंडळे, विविध राज्यांच्या पारंपरिक वेषभूषेतील स्त्री-पुरुष, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना सहभागी करून घेतले जाते.

असंख्य वाहने, घोडे, बैलगाड्या, चित्ररथ,ढोल ताशे, लेझीम, टाळ यांच्या तालावर आनंदात न्हाऊन नृत्य करणारी व मनोरे, दांडपट्टा आणि तलवारीची प्रात्यक्षिके करणारी तरूण पिढी यांसह भगवे ध्वज, पालख्या, विविध सत्पुरुष, महापुरुष यांच्या प्रतिमांसह त्यांच्या जयजयकाराच्या घोषणांसह स्वागतयात्रेत सामील झालेले हजारो स्वागत यात्री आणि ते चैतन्यमय दृष्य मनात साठविणारे लाखो नागरिक सहभागी होतात. आपल्या संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रांगोळी. इमारतींसमोर, चौकाचौकांत व रस्त्यारस्त्यांवर काढलेल्या आकर्षक व भव्य रांगोळ्या, घरोघरी आणि चौकाचौकांत उभारल्या जातात. भगव्या पताका आणि गुढ्या यांनी  डोंबिवली सजून जाते.

स्वागत यात्रींसाठी अनेक सेवाभावी संस्था व मंडळांकडून यात्रा मार्गावर  थंड पाणी, सरबत,ई.ची उत्स्फूर्तपणे विनामूल्य व्यवस्था केली जाते. अनेक रथांबरोबर या शोभायात्रेत स्वच्छता रथ सहभागी होतो हेही या शुभयात्रेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. पर्यावरण प्रदूषण याचाही विचार शोभायात्रात केला जातो. सर्वात शेवटी असलेला  “स्वच्छता रथ” प्लास्टिक ग्लास, ई. कचरा गोळा करून यात्रा मार्ग स्वच्छ ठेवण्यात तत्पर असतो. हिंदू सण व उत्सव यांवरील टीकाकारांचे सर्व आक्षेप या उपक्रमाने फोल ठरविले आहेत. खंडणी, वर्गणी  ऐवजी समाजातील प्रत्येक घटक स्वतः हूनच काही न काही प्रकारची मदत करण्यात धन्यता मानत असतो.

“वर्षानुवर्षे अविरतपणे चालू असलेल्या अनेक यात्रांमध्ये आणखीन एका यात्रेची भर” अशी एक रूढी अथवा दर वर्षी पार पाडायचे एक  “कर्मकांड” एवढेच भारतीय नववर्ष यात्रेचे स्वरूप सुद्धा राहिलेले नाही, तर अनेक सामाजिक कार्य यातून घडतात. अनेक सामाजिक कार्य आधीचे सात दिवस हाती घेतली जातात. सर्व भारतीय सण, उत्सव यानिमित्ताने एकत्र येऊन संघटित  शक्तीचे विराट दर्शन  घडावे, समाज संघटित व्हावा हाच दर वर्षी वर्ष प्रतिपदेला सर्व शहरांत आणि ग्रामीण भागातही  जल्लोशात निघणाऱ्या  “भारतीय नव वर्ष स्वागतयात्रेचा”  उद्देश असून तो निश्चितच सफल झाला आहे.

डोंबिवली येथील शोभायात्रा सुरू होऊन त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर आबासाहेब पटवारी स्वतः कोकणात, विदर्भात, पुण्यात, औरंगाबाद येथे फिरले आणि त्यांनी अशा प्रकारच्या शोभायात्रा आखण्यासाठी  प्रोत्साहन दिले असं गणेश मंदिराच्या सध्याच्या अध्यक्ष मुतालिक ताई यांनी सांगितले. डोंबिवलीतील मुसलमान समाजाला भेटून त्यांनाही सहभागी होण्याचं आवाहन पटवारी यांनी केलं होतं. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर डोंबिवलीचे रहिवासी असताना एके वर्षी त्यांच्या हस्ते शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली, असं मुतालिक ताई म्हणाल्या. पटवारी साहेबांचं हे कार्य मुतालिक ताईंनी स्वतः जवळून पाहिलं आहे. त्याचा उपयोग आता त्या व  समिती शोभायात्रेच व्यवस्थापन करण्यासाठी करत असतात. यंदाही भरघोस कार्यक्रमांची रेलचेल पाडव्याच्या आधीचे सात दिवस, गुढीपाडवा आणि नंतरच नवरात्र या काळात आयोजित करण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून नवीन संकल्पनांच्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो.
joshishibani@yahoo. com

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

56 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago