Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

MLA Nitesh Rane: ४ जूननंतरही मोदीच देशाचे पंतप्रधान

MLA Nitesh Rane: ४ जूननंतरही मोदीच देशाचे पंतप्रधान

आमदार नितेश राणे यांचा विश्वास

मुंबई : देशाचे पंतप्रधान कोणतेही नियम न तोडता, आचारसंहितेचे पालन करत आहेत. आचारसंहिता असतानाही त्यांचा प्रोटोकॉल तसाच राहतो. त्यामध्ये काहीच बदल होत नाही. जोवर दुसरे पंतप्रधान निवडून येत नाहीत, तोवर पंतप्रधान तेच असतात. ४ जूननंतर देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे अकलेचे तारे तोडले आहेत. पंतप्रधानांचा दौरा आणि त्यांचा लवाजमा हा आचारसंहितेचा भंग असल्याचा नवीन जावई शोध राऊत यांनी लावला आहे. ते आता पंतप्रधान नसून काळजीवाहू पंतप्रधान असल्यामुळे ते या सर्व गोष्टी करू शकत नसल्याचा शोध राऊत यांनी लावला आहे. ज्यांनी साधी ग्रामपंचायत निवडणूक लढविली नाही. लोकांमध्ये कसे निवडून यायचे हे ज्याला माहीत नाही. ईशान्य मुंबईची जागा लढविण्याची ताकद नसल्याने संजय दिना पाटील यांच्या गळ्यात माळ घालून त्याचा राजकीय बळी देण्यात येत असल्याचा आरोप आमदार राणे यांनी केला.

नितेश राणे म्हणाले की, इलेक्टोरल बॉण्डच्या नावाने उबाठा सेनेला दिलेले पैसे व देणगीदार कोण ह्याची चर्चा झाली पाहिजे. बीजेपीच्या नावाने मंत्र बोलण्यापेक्षा उबाठा सेनेने हे जाहीर करावे, असे आव्हान राणे यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरला पाठविण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करू असा काल उद्धव ठाकरे यांनी मोठा जोक मारला. मात्र ज्याने स्वतःच्या वस्तू सुद्धा स्वतःच्या पैशाने विकत घेतल्या नाहीत. ते फडणवीस यांच्या मणिपूर दौऱ्याचा खर्च करण्याची भाषा करतात, असा टोला राणे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा खर्च किती आहे, हे निवडणूक आयोगाला माहीत आहे. पण उद्धव ठाकरे काल दिल्लीला गेले त्याचा खर्च किती झाला ह्याची माहिती घ्यावी, असा टोला राणे यांनी राऊत यांना लगावला.

Comments
Add Comment