Saturday, December 14, 2024
Homeताज्या घडामोडीमतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न

निरनिराळ्या माध्यमातून करणार जनजागृती

मुंबई : लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण सहा मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पालिकेकडून देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामध्ये सहा मतदारसंघांतील गृहनिर्माण संस्था, मोठ्या इमारती, व्यापारी संकुल, मंडई, चित्रपटगृहे, बाजारपेठ, नाट्यगृहे, मॉल, शाळा, महाविद्यालयांमध्ये निरनिराळ्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

पुढील महिन्यात सोमवार दिनांक २० मे रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील मिळून सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्या दृष्टीने पालिका, मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडून समन्वयाने कामकाज सुरू आहे. गत वेळी म्हणजेच सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या मतदानापेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. गतवेळी पालिका प्रभागनिहाय मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांपेक्षा कमी होती. त्या प्रभागांतील टक्केवारी कशी वाढेल, यासाठी प्रशासनाचा आराखडा तयार करा, असे निर्देश यावेळी अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले.

जास्तीत जास्त मुंबईकरांनी २० मे रोजी मतदान करावे, यासाठी ठिकठिकाणी जनजागृती फलक लावण्यात येणार आहेत. या शिवाय वृत्तपत्रांतून जाहिराती, नभोवाणी संदेश, भित्तीपत्रके, तसेच समाज माध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये याबाबत नियोजन करण्यात आले आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांना देखील जनजागृती मोहिमेत सहभाग करून घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्येही जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. याचबरोबर बसस्थानक, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मतदानाची आठवण करून देण्यासाठी सातत्याने उद्घोषणा देण्यात येणार आहेत.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दररोज कचरा संकलन करण्यासाठी पालिकेची वाहने मुख्य परिसरांसह गल्लीबोळात जातात. या वाहनांवरून सार्वजनिक उद्घोषणा करीत मतदानासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, बचत गटांमधील सदस्य, शिक्षकांनाही या जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -