Thursday, July 3, 2025

महागाईमुळे सर्वसामान्यांकडून सोने खरेदी लांबणीवर!

महागाईमुळे सर्वसामान्यांकडून सोने खरेदी लांबणीवर!

लवकरच प्रतितोळा ७५ हजार होण्याची शक्यता


मुंबई : भारतात लग्नसराई आणि सणासुदीच्या प्रसंगांवेळी सोन्याचे दागिने आणि वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर झपाट्याने वाढत आहे. सोन्याच्या किमतीने सोमवारी नवा उच्चांक गाठला. ही परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर ७५ हजार रुपयांची पातळी गाठेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. लग्नसराईसाठी सोने खरेदी करू पाहणाऱ्या सामान्य नागरिकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.


सोमवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या किमतीने सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली. वायदे बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर ६९,४८७ रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर जीएसटीसह ६८,७०० रुपये इतका नोंदवण्यात आला, तर पुण्यात सोन्याच्या प्रतितोळा दराने जीएसटीची रक्कम पकडून ७०,८४३ रुपयांचा स्तर गाठला. यापूर्वी २६ मार्चला सोन्याचा प्रतितोळा दर ६६,४२० रुपये इतका होता. मात्र, अवघ्या चार ते पाच दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.


Comments
Add Comment