Wednesday, September 10, 2025

BJP: राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

BJP: राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मॅच फिक्सिंग आणि ईव्हीएम हॅकिंगसारखे आरोप प्रकरण

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने रविवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर ‘लोकशाही वाचवा' सभेचे आयोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेतून भाजपावर मॅच फिक्सिंग व ईव्हीएम हॅकिंगसारखे आरोप केले. राहुल गांधींच्या याच वक्तव्याविरोधात भाजपाने निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. भाजपा त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाला, तर देशाची घटना बदलली जाईल व लोकांचे अधिकार नष्ट होतील. ही मॅच फिक्सिंग थांबवण्यासाठी संपूर्ण ताकदीने मतदान करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. मॅच फिक्सिंगशिवाय, ईव्हीएम (हॅकिंग), सोशल मीडिया व प्रेसवर दबाव आणल्याशिवाय ते १८० चा टप्पाही पार करू शकणार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता.

भ्रष्टाचारात बुडालेल्या लोकांची सभा : भाजपा

दरम्यान, भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील इंडिया आघाडीच्या लोकशाही वाचवा सभेवर जोरदार टीका केली होती. सभा घ्यायला बंदी नाही, पण जमवणारे कोण? जे भ्रष्टाचारात बुडाले आहेत ते... जे जनतेचा पैसा लुटून तुरुंगात गेले आहेत ते. केजरीवाल लालूंच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. असे भ्रष्टाचारी लोक पंतप्रधान मोदींच्या प्रामाणिक सरकारविरोधात एकवटले आहेत. पण, या देशातील जनता त्यांचे ऐकणार नाही. ४ जूनला सर्व काही स्पष्ट होईल, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment