Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच!

नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच!

आधी गोडसे, मग भुजबळ, पाठोपाठ दादा भुसेही मुंबईला रवाना

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. ही जागा छगन भुजबळांना मिळणार अशी कुणकुण लागताच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी तातडीने मुंबई गाठली. गोडसेंपाठोपाठ छगन भुजबळ देखील मुंबई गाठत आहेत. आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे देखील यवतमाळचा दौरा रद्द करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून मुंबईचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र या नंतर महायुतीच्या नेत्यांनी यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. भाजपकडे जास्त ताकद आहे, असे म्हणत नाशिक जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली.

गोडसे, भुजबळ यांच्या पाठोपाठ आता दादा भुसेदेखील मुंबईला रवाना झाले आहेत. दादा भुसे यांचा मंगळवारी यवतमाळ दौरा होता. मात्र दौरा रद्द करून ते तातडीने मुंबईकडे निघाले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव आणि तिढा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

भुजबळ नक्की कुणाला भेटणार?

छगन भुजबळ यांनी काल येवल्यात बोलताना पक्षाने आदेश दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असे म्हटले होते. तसेच दिल्लीतून माझे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले, असे देखील त्यांनी म्हटले होते. आता छगन भुजबळ देखील मुंबईत पोहोचले असून ते नक्की कुणाला भेटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मुंबई दौरा आणि उमेदवारी याचा काही संबंध नसल्याचे भुजबळ यांच्या गोटातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

भुजबळ की गोडसे ? कुणाला मिळणार उमेदवारी?

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी छगन भुजबळांनी मिळाली तर हेमंत गोडसे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. आता जर भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यास हेमंत गोडसे बंडखोरी करत निवडणूक लढवणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नाशिक जागा हेमंत गोडसेंनाच मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -