
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता खड्ड्यांबरोबर धुळीचे साम्राज्य पसरले असून माभळे ते कोळंबे परिसरात धुळीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. चौपदरीकरणाची कामे सुरू झाली आहेत. मात्र धूळ रोखण्यासाठी पुरेशी उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांना व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
वाहनचालकांसह लोकांनी किती वर्षे त्रास सहन करावा याला काही मर्यादा आहेत. यात सर्वसामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. होणारा त्रास सांगणार तरी कोणाला आणि सांगून त्याची दखल तरी घेणार कोण? अशी अवस्था प्रवाशी आणि वाहनचालकांची झाली आहे. धामणी ते कोळंबे पर्यंत रस्त्याची कमालाची दुरवस्था
झाली आहे.
खड्ड्यांमधून बाहेर आलेले दगड ट्रकच्या चाकातून असे उडतात की समोरचा पादचारी किंवा मोटरसायकलवाला यांच्या डोळ्यांना, डोक्याला जबर मार बसून नाहक जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित यंत्रणेने खड्ड्यांचा आणि धुळीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर चांगल्या कायमच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.