Saturday, July 13, 2024
Homeदेश90 Rs coin in India : रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त...

90 Rs coin in India : रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी जारी केलं ९० रुपयांचं नाणं

खास वैशिष्ट्यपूर्ण या नाण्याची किंमत हजारो रुपयांत

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank of India) आज ९० वर्षे पूर्ण झाली. या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईच्या नरिमन पॉइंट (Nariman Point) येथील एनसीपीए (NCPA) या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ९० रुपयांचे नाणे जारी केले. देशात पहिल्यांदाच ९० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे.

९० रुपयांचे हे नाणे शुद्ध चांदीचे आहे. यामध्ये ४० ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला ९० रुपये असे लिहिलेले आहे. या नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिले आहे. त्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि वरच्या परिमितीवर हिंदीमध्ये आणि खालच्या परिमितीवर इंग्रजीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेले आहे.

भारत सरकारच्या टांकसाळीमध्ये बनवलेल्या या ९० रुपयांच्या नाण्याचे वजन ४० ग्रॅम आहे. हे ९९.९ टक्के शुद्ध चांदीपासून बनलेले आहे. याआधीही १९८५ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण महोत्सवी आणि २०१० मध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम ज्युबिलीवर स्मारक नाणी जारी करण्यात आली आहेत.

नाण्याची किंमत आहे हजारो रुपयांत

९० रुपयांचे हे नाणे लाँच केल्यानंतर दर्शनी मूल्यापेक्षा अधिक प्रीमियमवर विकले जाईल. वृत्तानुसार, या नाण्याची अंदाजे किंमत ५२०० ते ५५०० रुपये असण्याची शक्यता आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्राहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्साह आहे. १९ मार्च २०२४ रोजी, आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती.

पंतप्रधान काय म्हणाले?

आज या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका खूप महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -