पूनम महाजनांची पुनरावृत्ती की भाजपा देणार नवा उमेदवार
मुंबई : मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आधी कॉँग्रेस तर नंतर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. विलेपार्ले, चांदिवली, कर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, व वांद्रे पश्चिम अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो. अलिकडे कॉँग्रेसचे एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त व शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. भाजपच्या पूनम महाजन या गेल्या दोन टर्मपासून खासदार आहेत. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत तरी त्यांना स्थान मिळू शकले नाही. भाजप यंदा पूनम महाजन यांची उमेदवारी देणार नसल्याची चर्चा आहे. तर आघाडीकडूनही अद्याप उमेदवार जाहिर झाला नाही.
२०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या पूनम महाजन यांनी ४,८६,६७२ मते मिळवत कॉँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्यावर १ लाख ३० हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळवित सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला असल्याने या ठिकाणी आजही भाजपाचे पारडे जड मानले जातआहे. भाजप व कॉँग्रेस अशी पारंपरिक लढाई इथे राहत असल्याने कॉँग्रेसच्या उमेदवाराविषयी उत्सुकता असली तरी मतदारसंघातील कॉँग्रेसचे एकमेव आमदार झिशान सिद्दीकी यांचीही पक्षावर नाराजी आहे. शिवसेनेचे दोन व भाजपाचे दोन आमदार असल्याने राजकीयदृष्ट्या महायुती या ठिकाणी कॉँग्रेसच्या तुलनेत प्रबळ आहे. २००४ आणि २००९ साली या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार तर २००९ आणि २०१४ साली या ठिकाणी भाजपाचा उमेदवार विजयी झाला होता.