भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मांडली समीकरणे
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा ३७० आणि एनडीए ४०० पार करणार, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे सर्व नेते करत आहेत. आता भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही यावर भाष्य केले. गडकरींनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३७० जागांच्या टार्गेटवर पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. भाजपा ३७० चा आकडा कसा गाठणार, हेदेखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवतील, कारण सरकारने गेल्या १० वर्षांत अनेक ठोस कामे केली आहेत. भाजपा नेतृत्वाखालील एनडीए ४०० जागांचा आकडा पार करेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सध्या अंमलबजावणी संचालनालय व सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकार वापर करत असल्याचे विरोधकांचे आरोप फेटाळून लावत गडकरी म्हणाले की, विरोधकांनी जनतेचा विश्वास मिळवून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. भाजपाने तो केला.
मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार
देशाच्या विकासाबाबत बोलताना गडकरी म्हणाले, देशातील जनतेला विकास पाहायचा आहे, त्यामुळेच त्यांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. निवडणुकीत हा विश्वास स्पष्टपणे दिसून येईल. यंदाही आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि आम्ही ४०० चा आकडाही पार करू. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असेही गडकरींनी यावेळी स्पष्ट सांगितले.
१० वर्षांच्या कामाचे परिणाम
यावेळी नितीन गडकरींनी ३७० जागांचे गणित समजावून सांगितले. ते म्हणाले, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाने गेल्या १० वर्षांत दक्षिण आणि ईशान्य भागात खूप काम केले आहे, ज्याचे परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिसतील. गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपा मजबूत झाला आहे. आम्ही तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये खूप मेहनत घेतली. गेल्या काही वर्षांत पक्षाने उत्तर भारतातही चांगली कामे केली. दक्षिणेत भाजपाचे अस्तित्व कमी आहे, परंतु यंदा दक्षिणेत आमची कामगिरी चांगली असेल. त्यामुळेच एकट्या भाजपाला ३७० जागा मिळतील आणि एनडीए ४०० चा आकडा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.