एक नंबर पिकलेल्या हापूस आंब्याचा दर अठराशे ते दोन हजार रुपये
रत्नागिरी : राज्यातील विविध मार्केटमध्ये आंब्याला कमी भाव मिळत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वत:च्या बागेतील पिकलेल्या आंब्याला १८०० ते २००० रुपये दर मिळत असल्याने आंबा शेतकरी समाधानी झाला आहे. नैसर्गिक शेतीने सर्वांना आकर्षित केलेले असताना झाडावर पिकलेला आंबा आणि आडीतील आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अन्य बाजारपेठेत पाठवायला मालच शिल्लक नाही, अशी स्थती अनेक आंबा शेतकऱ्यांची झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एक नंबर हापूस आंब्याला होळी तसेच रंगपंचमीच्या कालखंडात मोठी मागणी असते. आलेला चाकरमानी एक नंबरचा पिकलेला आंबा १८०० ते २००० रुपये दराने खरेदी करत आहे. अन्य मार्केटमध्ये पाठवून कमी दर मिळण्यापेक्षा स्थानिक बाजारपेठेतच चांगल्या दराने आंबा विकला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. चारच डझन आंबा विकू पण तो चांगल्या प्रतीचा असेल, जीआय मानांकनाचा असेल असे आंबा शेतकरी ठासून सांगत आहेत. त्यामुळे कोवळा आंबा, लासा आंबा, फळमाशी पडलेला आंबा, डांगी आंबा याला पूर्णविराम मिळाला असून अस्सल हापूस आंबा आणि तोही जीआय मानांकन प्राप्त रत्नागिरी बाजारपेठेतील ग्रामीण विक्रेत्या महिलांसह व्यापाऱ्यांकडेही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दलालांची असणारी मक्तेदारी पूर्णपणे मोडीत निघाली आहे.
रत्नागिरी बाजारपेठेत चांगल्या प्रतीचा आंबा विठ्ठल मंदिर तसेच धनजीनाका, मारुती मंदिर या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांसह व्यापाऱ्यांकडेही विक्रीसाठी उपलब्ध आहे. खर्चाचे मागील गणित पाहता हापूस आंब्याचा दर पुढेही असाच टिकून राहिल, अशीच आशा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी लासा तसेच रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेला आंबा कमी दरात उपलब्ध असला तरी त्याकडे अनेक चाकरमानी ढुंकूनही पहात नसल्याचे चित्र आहे.