तहसीलमधील प्रतिज्ञापत्राची सक्ती; नागरिकांची गैरसोय
गौसखान पठाण
सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील एकमेव पाली नगरपंचायत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने सतत चर्चेत राहणारी नगरपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे. असेच एका घटनेने पाली नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण विविध कामांसाठी नगरपंचायतकडून पब्लिक नोटरी न स्वीकारता केवळ तहसील कार्यालयातून प्रतिज्ञापत्र बनवण्याची मागणी नगरपंचायतकडून केली जात आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरक त्रास होत आहे. शिवाय वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंड बसत आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की पाली येथील वकील नोएल चिंचोलकर यांनी पाली नगरपंचायतीमध्ये आपल्या मुलाच्या विवाह नोंदणी करिता अर्ज केला होता. पाली नगरपंचायतीने ऍड. नोएल चिंचोलकर यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या विवाहाच्या नोंदणीकरिता त्यांचा मुलगा व त्यांची पत्नी यांचे संयुक्त प्रतिज्ञापत्र मागितले होते. परंतु सदरचा प्रतिज्ञापत्र हा फक्त तहसील कार्यालयातूनच नोंदणी करून देण्याची सक्ती पाली नगरपंचायत अधिकारी यांच्याकडून केली
जात आहे.
चिंचोलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र मे. पब्लिक नोटरी यांच्यासमोर करून देतो असे सांगितले असता संबंधित अधिकाऱ्यांनी चिंचोलकर यांना नोटरी करून आणलेला प्रतिज्ञापत्र आमच्याकडे स्वीकारले जाणार नाही असे सांगितले. यावेळी चिंचोलकर यांनी संबंधित अधिकारी त्यांना विचारणा करून प्रतिज्ञापत्र हे फक्त तहसील कार्यालयातूनच नोंदणी करून आणण्याबाबत शासनाचा तसा आदेश, शासन निर्णय अथवा पत्रक दाखवण्याची देखील विनंती केली. या प्रकरणांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की की, पाली नगरपंचायतीचे अधिकारी अलिखित कायद्याची सक्ती करताना दिसत आहे.
केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासन यांनी नेमलेले नोटरी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उत्पन्न करीत आहेत. शिवाय तहसील कार्यालयातून प्रतिज्ञापत्र करणे म्हणजे वेळ व पैशाचा अपव्यय आहे. नोटरी शासकीय नियमाप्रमाणे असल्याने ती नाकारणे म्हणजे शासनाला आव्हान करण्यासारखे आहे. याबाबत पाली नगरपंचायत त्यांच्या अलिखित नियमांबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिज्ञापत्र सक्ती करण्याबाबत वरिष्ठ कार्यलयाकडे तक्रार दाखल करणार
सर्वच सरकारी कामांमध्ये पब्लिक नोटरी स्वीकारले जातात. मग पाली नगरपंचायतमार्फत तहसील कार्यालयातील नोंदणीकृत प्रतिज्ञापत्राबाबत सक्ती का करण्यात येत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यलयाकडे तक्रार दाखल करणार आहे, असे ऍड. नोएल चिंचोलकर यांनी सांगितले.
संबंधितांकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर विवाह नोंद करण्यात येईल, असे पाली नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या येरूणकर यांनी सांगितले.