Categories: कोलाज

वाचनाचे रोपटे रुजवताना…

Share

२ एप्रिल हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. मुलांचे पुस्तकांपासूनचे वाढते अंतर कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. बालवयातच मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्याचे औचित्य यानिमित्ताने साधले जाते. मात्र वाचनाची आवड लावण्याचे काही महत्त्वपूर्ण टप्पे असून प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पार पाडायला हवा, हेदेखील यानिमित्ताने समजून घ्यायला हवे. एकदा मुले वाचनविषयक प्रगल्भ झाली की त्यांना कोणीही या मार्गापासून परावृत्त करू शकत नाही. म्हणूनच हे महत्त्वाचे…

विशेष – डॉ. अर्चना कुरतडकर, अभ्यासक

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने २ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या काळात वाचनाचे महत्त्व नव्याने जाणून घेणे गरजेचे आहेच; खेरीज लहानग्यांना वाचनाचे संस्कार देणे विशेष महत्त्वाचे आहे. या दोन्ही अर्थाने हा दिवस आणि त्यामागील उद्देश लक्षात घ्यायला हवा. मुळात वाचन ही एक सवय असून त्याची सुरुवात मूल गर्भात असल्यापासून करायला हरकत नाही, असे मला वाटते. गर्भवती काही ना काही वाचतच असते. तेच थोडे सजगतेने वाचले, मोठ्याने वाचले तर पोटातील बाळावर परिणाम होऊ लागतो. आई-वडिलांच्या या कृतीचा पुढच्या टप्प्यात चांगला परिणाम बघायला मिळतो. मूल जन्माला आल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो. त्यातही पहिले काही महिने लहानगे रात्री जागवत असल्यामुळे पालक झोपू शकत नाहीत. अशा वेळी काय करायचे? हा प्रश्न सोडवण्यासाठी ते काहीबाही बडबड करत राहतात, कसाबसा वेळ काढतात. मुलगी लहान असताना मी शांत झोप लागेपर्यंत मोठ्याने गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवण्याचा प्रयोग केला होता. जन्मापासून जवळपास सहा महिने ती रात्री झोपली नाही. त्या संपूर्ण काळात आम्ही रोज तिला वेगवेगळ्या कविता, गोष्टी ऐकवल्या. ते विविध प्रकारचे लेखन होते. प्रथितयश लेखकांचे बालसाहित्य त्यात होते. संग्रही असल्यामुळे आम्ही तेव्हापासूनच तिला कुसुमाग्रज, बोरकरांच्या कविता ऐकवल्या. माझ्या मते ही वाचनाची सुरुवात असण्यास हरकत नाही.

मूल मोठे होते, बसायला लागते, घरात थोडे फिरू लागते, त्या काळात त्यांच्यासमोर पुस्तके ठेवली, तर ही वाचनाची पुढची महत्त्वपूर्ण प्रक्रिया होऊ शकते. सध्या छोट्यांसाठी खास पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती विशिष्ट साहित्यापासून बनवली असून, मुलांना हाताळण्यास योग्य असतात. छोट्यापासून मोठ्या आकारामध्ये ती मिळतात. मुलांनी त्यातील रंगीबेरंगी चित्रे बघणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हीदेखील वाचनाची एक प्रक्रिया असते. इथपासून त्यांच्यामध्ये आवड रुजण्यास मोठी मदत होते. साधारणत: दीड ते पावणेदोन वर्षांचे मूल बोलू लागते. इतकेच नव्हे, तर ते वाचायलाही लागते. हातात धरलेल्या पुस्तकातील फूल वा एखाद्या प्राण्याचे चित्र बघून ते त्याच्याशी त्याच्या भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करते. या वयाच्या मुलांना मजकूर समजत नसला, वाचता येत नसला तरी चित्र भावतात. चित्रांमध्ये त्यांना कुठे तरी दादा दिसतो, ताई दिसते, आई दिसते आणि मग त्यांचे पुस्तकांशी संवाद साधणे सुरू होते. वाचनाची आवड निर्माण होण्यातले हे एक महत्त्वाचे वळण आहे, असे आपण म्हणू शकतो.

वाचनाची आवड रुजवण्यासाठी शाळेचा टप्पा जाणीवपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. बालमानसशास्त्राचा विचार करता, लेखनाआधी वाचन आले पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात. मुलांनी वाचनातून लेखनाकडे गेले पाहिजे. आपल्याकडे याच्या नेमके उलटे होते. तिसऱ्या वर्षी मुलांना लिहिणे शिकवले जाते. साहजिकच मुलांचे वाचनाचे कौशल्य वा आवड हव्या त्या प्रमाणात विकसित होत नाही. त्यामुळेच या टप्प्यात वाचनाला प्राधान्य देणारे, वाचनाकडे घेऊन जाणारे उपक्रम निवडणे गरजेचे आहे. हे शालेय आणि कौटुंबिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्हायला हवे. यामुळेही मुलांवर चांगले वाचन संस्कार होण्यास मदत होईल.

साधारणत: पाचव्या वर्षी मूल अक्षर वाचू लागते. एकदा साधी साधी अक्षरे वाचायला आली की त्यांना जोडाक्षरेविरहित पुस्तके द्यावीत. अशी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती दिल्यास मुले साडेपाच ते सहाव्या वर्षी गोष्टीची पुस्तके सहज वाचू लागतात. म्हणजेच वाचनाचे संस्कार, त्याची तोंडओळख करून देणे आणि गोडी वाढवणे ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया असून पालकांनी ती न कंटाळता राबवायला हवी. घरात पसारा दिसला तरी दुर्लक्ष करून मुलांना सहज हाती लागतील अशा ठिकाणी पुस्तके ठेवावीत. स्वत: पालकांनी ती वाचावीत आणि मुलांना वाचण्यास उद्युक्त करावे. मुख्य म्हणजे कामाच्या धबडग्यात पालकांना वाचनासाठी फारसा वेळ देता आला नाही तरी मुलांना याची स्पष्ट कल्पना देऊन तो त्याच्या वयाचा एक भाग असल्याचे समजून सांगायला हवे. मुलांचे दिवसभराचे काम आखताना वाचनासाठी अर्धा-पाऊण तास राखीव ठेवायला हवा. याकडे लक्ष दिले, तर बघता बघता वाचन हा त्यांचा नित्यक्रमाचा भाग होऊन जातो. नंतर त्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. म्हणूनच वाचनाची प्रक्रिया राबवणे आणि रुजवणे हे पालक, शिक्षक आणि समाज म्हणून सगळ्यांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे. वाचणे हा आपल्या जगण्याचा एक आविभाज्य भाग आहे, हे समजेल तेव्हा अनेक प्रश्न कायमचे निकाली ठरतील.

वाचनाची गोडी लागण्यासाठी शाळा आणि घरामध्ये अनेक कार्यक्रम घेता येतील. मुलांशी संबंधित काम करणाऱ्या संस्थांमध्ये देखील असे उपक्रम घेतले जायला हवेत. मी लहान मुलांच्या मासिकाचे काम बघत असल्यामुळे याचे महत्त्व नेमकेपणाने जाणते. विवेकानंद, राजा शिवछत्रपती यांचे चरित्र. बाबासाहेब पुरंदरे यांची पुस्तके वाचलेली चौथी-पाचवीतील बरीच मुले मी पाहते. म्हणजेच या सगळ्या प्रक्रियेमध्ये मूल प्रगल्भ होत जाते. ते वयाने प्रगल्भ होते की नाही हा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. वाचत असूनही ते वयाप्रमाणे बालिश वागू शकते, ते अपेक्षितही आहे. मात्र त्याच वेळी त्याचे वाचनाचे वय मात्र वाढत असते. ही बाब अतिशय गरजेची आहे असे मला वाटते. कारण एकदा असे झाले की, नंतरच्या आयुष्यात त्या मुलांना कोणीही वाचनापासून थांबवू शकत नाही. ती वाचतच राहतात. म्हणूनच मुलांना या वळणापर्यंत आणून पोहोचवणे ही पालकांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे.

पाचवी-सहावीपर्यंत वाचनाची आवड लागली तरी नंतर एखादे मूल वाचन सोडू शकते. पण यात काहीही चूक नाही. त्याच्या आयुष्यातील वाचनासंदर्भातील ती एक फेज असू शकते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतात. त्या या संदर्भातही घडू शकतात. मात्र त्याचा अर्थ त्या मुलांच्या आयुष्यातील वाचन संपले, असा होत नाही. शिक्षणाच्या, कामाच्या रेट्यामुळे वाचण्याचा वेग, प्रमाण कमी होऊ शकते. घर, ऑफिस वा इतर जबाबदाऱ्यांमुळे इच्छा असूनही वाचन मागे पडते. पण ही परिस्थितीजन्य बाब म्हणावी लागेल. त्यावर मात करून लोक जमेल तसे वाचतच असतात.

वाचनाची आवड निर्माण होण्याबरोबरच मुलांना नेमके काय वाचायला आवडते, हे बघणेही गरजेचे आहे. एखाद्याने २०-२५ पुस्तके वाचलेली असतील, तर त्यातील कोणते आवडते आणि का आवडले या संदर्भात बोलते करायला हवे. ही वाचनप्रक्रियेला आधारभूत ठरणारी बाब ठरते. आपोआपच मुले आपल्याला काय आवडते, याचा विचार करू लागतात. शेवटी स्वत:कडे प्रगल्भतेने आणि जाणीवपूर्वक पाहण्याची क्षमता निर्माण करणे, हाच वाचनाचा मूळ उद्देश आहे. स्वत:ला समजून घेण्याची कुवत वाचनातून निर्माण होत असते. भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असणारे शब्द वाचलेल्या पुस्तकातून, कथेतून, कवितेतून मिळत असतात. म्हणूनच नव्या अभिव्यक्तीच्या स्वरूपात मुलांकडून वाचलेले पुन्हा एकदा व्यक्त करवून घेतले, तर चांगला परिणाम बघायला मिळतो. या सगळ्यांतूनही वाचनाची चांगली परंपरा पुढे जाते.

आता सुट्टीचे दिवस सुरू झाले आहेत. मुलांचे वाचन वाढवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे असेच म्हणावे लागेल. पण शंभरातील सगळीच्या सगळी मुले वाचतीलच, अशी आशा धरण्यातही अर्थ नाही. हा अट्टहास चुकीचा ठरेल. २० टक्के मुलांना वाचनात रुची निर्माण होते, तर अन्यांना आणखी एखाद्या गोष्टीमध्ये रस निर्माण होऊ शकतो. बरेचदा मुलांना वाचायला आवडते, पण आपण त्यांना त्यांच्या आवडीचे साहित्य पुरवण्यात कमी पडतो. जसे की, एखाद्याला कविता आवडतात, एखादीला कविता आवडतात, एखाद्याला माहितीपर वाचायला आवडते. त्यामुळेच वाचनाच्या आवडीनुसार आपण पुस्तके देत आहोत का, हाही मुद्दा विचारात घ्यायला हवा. माझ्या पाहण्यात अशीही मुले आहेत, ज्यांना केवळ शास्त्राशी संबंधित वाचन आवडते. ती मुले या संबंधीच्या रहस्यकथा, गूढकथाही वाचत नाहीत. अर्थातच ही काही त्यांची मर्यादा नसते, तर आवडीचा भाग असतो. पालक आणि शिक्षकांनी तो ओळखणे गरजेचे आहे. मुलांना केवळ वाचनाचा आग्रह न करता पूरक जोड देण्याचा प्रयत्नही व्हावा. उदाहरणार्थ, मुलांचा गट करून त्यात वाचलेली कविता सादर करण्यास सांगणे, वाचलेली कथा अभिनयाद्वारे सांगणे असे उपक्रमही उपयुक्त ठरतील. अशा वेगळ्या प्रयोगातून मुलांना सादरीकरणाची संधी मिळेल आणि त्यापोटी होणारे वाचन अधिक समजपूर्वक होईल. त्याचे आकलन होण्यास मदत होईल. आजकाल सादरीकरण आणि गटातील प्रत्यक्ष सहभागाला आलेले प्रचंड महत्त्व लक्षात घेता याचे महत्त्व विशेषत्वाने लक्षात येते. हे सगळे मुद्दे मुलांमधील वाचनप्रेमाचे रोपटे रुजवण्यास खतपाणी घालण्याचे काम करतील, हे नक्की.

(शब्दांकन : स्वाती पेशवे)

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

2 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

27 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

35 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

1 hour ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

2 hours ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago