Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीChandrapur Loksabha : गाव तिथे बिअर बार! चंद्रपुरातील महिला उमेदवार देतेय दारुचं...

Chandrapur Loksabha : गाव तिथे बिअर बार! चंद्रपुरातील महिला उमेदवार देतेय दारुचं आश्वासन

बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी हा कोणता नवा प्रचार?

चंद्रपूर : निवडणुकीला (Election) उभे राहिलेले उमेदवार अनेक आश्वासने देताना आपण पाहतो. त्यातील अनेक आश्वासने निवडून आल्यानंतर मात्र विस्मरणात जातात. साधारणतः या आश्वासनांमध्ये वीज, पाणी, अन्न, महागाई अशा जीवनावश्यक समस्या सोडवण्याचा प्रयत्न हे उमेदवार करत असतात. मात्र, चंद्रपुरातील (Chandrapur) एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने चक्क ‘गाव तिथे बिअर बार’ सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यावर खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे. अखिल भारतीय मानवता पक्षाकडून त्या निवडणूक लढवणार आहेत. विकास कार्याचे आश्वासन घेऊन नेते जनते समोर उभे होतात. याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, असे आश्वासन त्या देत आहेत.

गाव तिथे दारूचे दुकान असे त्यांचे धोरण आहे. समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही फार मोठी चूक असल्याचे त्या म्हणतात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा दारुसाठी प्रसिद्ध आहे. बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी ही महिला उमेदवार थेट बिअर बारचा परवाना देण्याचे आश्वासन देत फिरत असल्याने मतदारांमध्ये या महिला उमेदवाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दारु ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. उलट माणसाने दारुच्या आहारी जाऊ नये असाच सल्ला दिला जातो. मात्र, वनिता राऊत यांच्या आश्वासनाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे मतदार किती आकर्षित होतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कोण आहेत वनिता राऊत?

वनिता राऊत ह्या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर येथून २०१९ ची लोकसभा, २०१९ मध्ये चिमूर विधानसभा निवडणुक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी जिल्ह्यात दारुबंदी होती. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी उठवून ठिकठिकाणी दारूचे दुकाने उघडण्यात यावी अशी मागणी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -