दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
शारिरीक व्यंगावरून एखाद्याला चिडवणं हे आपल्याकडे सहज घडणारी क्रिया म्हणून पाहिलं जातं. त्या दोघींना तर त्यांच्या कुरळ्या केसांवरून चिडवलं जायचं. कुरळे केस म्हणजे नसती आफत त्यांना वाटली होती. मात्र त्यांना वाटणाऱ्या या ‘आफत’ने त्यांना कोटींची उलाढाल करणाऱ्या उद्योगाची उद्योजिका बनवले. ही गोष्ट आहे ‘मेनटेन (Manetain) स्टोअर प्रा.लि.’च्या संचालिका युबा रोमीन आगा आणि हिनशरा मानदथ हबीब यांची. कुरळे केस असलेल्या दोन महिला, युबा आणि हिनशरा या दोघी सुद्धा कुरळ्या केसांच्या. कुरळ्या केसांच्या व्यक्तींनी तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून या दोघींची ओळख झाली.
युबा मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली. तिने होली क्रॉस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर तिने २००८ मध्ये नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील डेंटल स्कूल आणि हॉस्पिटल मधून दंत वैद्यकशास्त्राची पदवी संपादन केली. हिनशरा ही कोची येथील एका व्यापारी कुटुंबातील आहे. तिने माध्यमिक शिक्षण कोचीच्या राजगिरी पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले, तर तामिळनाडूच्या निलगिरी येथील लॉरेन्स स्कूलमधून १२वी पूर्ण केली. त्यानंतर तिने क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बंगळूरु येथून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. ती डेलॉइट या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ऑडिट असिस्टंट म्हणून काम करत होती. २०१८ मध्ये त्यांनी प्रत्येकी ३०,००० रुपये गुंतवून केसांची निगा राखणारा ‘मेनटेन’ हा ब्रँड सुरू केला.
युबाचे शिक्षण विज्ञान शाखेतून झाल्यामुळे उत्पादनांबद्दलच्या सुरुवातीच्या संशोधनात तिला फायदा झाला. २०१६-१७ मध्ये कुरळ्या केसांची निगा राखणारी उत्पादने युबाला सापडली जी भारतात उपलब्ध नव्हती. तिला ते अमेरिका किंवा इंग्लंडमधून मागवावे लागत, ज्यामध्ये बरेच शिपिंग शुल्क होते आणि ते खूप महागदेखील होते. जेव्हा युबाला भारतीय बाजारपेठेत कुरळे केसांच्या उत्पादनांची कमतरता जाणवली तेव्हाच तिने अशी उत्पादने भारतात निर्माण करण्याचा निश्चय केला.
खरं तर युबाला तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये, केसांमुळे खूप छेडछाड आणि उपहासाचा सामना करावा लागला. ती जेव्हा कार्यक्रम किंवा महोत्सवामध्ये कुरळे केस दाखवण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा लोक खोडकर कमेंट्स करायचे. तिच्या हायस्कूलच्या दिवसातील एक प्रसंग आहे. एका लेक्चरमध्ये शिक्षकांनी त्यांचा लहान कंगवा गंमतीने युबाच्या डोक्यावर ठेवला आणि म्हटले की, “मी हा कंगवा तुझ्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला तर? मी तो पुन्हा शोधू शकणार नाही!” सारा वर्ग हसायला लागला. मात्र याचा युबाला खूप राग आला होता. ती मनातून दुखावली सुद्धा होती.
जेव्हा युबा आणि हिनशरा यांनी कुरळे केसांची उत्पादने बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी ॲक्सेसरीजपासून सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गरजा आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित विविध उत्पादनांची श्रेणी तयार केली आहे. त्यांनी एका स्थानिक शिंपीला गाठले. रेशीम आणि सॅटिनपासून बनवलेल्या केसांच्या उपकरणांची रचना तयार केली. ऑक्टोबर २०१८ मध्ये, त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे ‘मेनटेन’ लाँच केले. पुढे त्यांनी फ्लेक्ससीड्सपासून बनवलेली केसांची टोपी सादर केली, ज्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. मेनटेन हे केस आणि हीट कॅप्स, स्क्रंचीज आणि केसांची काळजी घेणारी उत्पादने बनवते, ज्यामध्ये मॉइश्चरायझिंग शैम्पू, कंडिशनर, क्लॅरिफायिंग शैम्पू आणि को-वॉश यांचा समावेश आहे. या दोघी पहिल्यापासून कुरळे केस असलेल्या व्यक्तींच्या व्हॉट्सॲप समुदायाचा भाग असल्याने, त्यांना ग्राहक मिळवण्यासाठी जास्त दूर जावे लागले नाही. त्यांना सुरुवातीला मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. मेनटेनचे उत्पादन १५० रुपयांपासून सुरू होते. सर्वांत महागडे उत्पादन हे २,२४० रुपयांपर्यंत जाते.
पहिल्याच आर्थिक वर्षात, सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी २० लाख रुपयांची उलाढाल केली होती. मेनटेनला वेबसाइटद्वारे विक्रीतील ६०%, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर तत्सम प्लॅटफॉर्मसारख्या तृतीय-पक्षाच्या वेबसाइटद्वारे ३०% आणि सॅलोनसोबत भागीदारीद्वारे १०% उत्पन्न मिळते. व्यावसायिक मॉडेल्स वापरण्याऐवजी युबा आणि हिनशरा स्वतःची उत्पादने स्वत:च प्रदर्शित करतात. ते पाहून ग्राहक त्यांच्या प्रामाणिकपणाकडे आकर्षित होतात. ब्रँडबद्दलचा त्यांचा आत्मविश्वास आणि समर्पणाचा हा पुरावा आहे. हे केवळ विपणनासाठी नाही, तर आपण जे ग्राहकांना जे देणार आहे, त्यावर मनापासून विश्वास ठेवण्याबद्दल आणि त्याच्या पाठीमागे दृढ विश्वासाने उभे राहण्याबद्दल आहे. युबाचे रोमीन आगा या व्यावसायिकाशी लग्न झाले असून रिदान हा ११ वर्षांचा मुलगा आणि आयशा व अमीर ही ६ वर्षांची जुळी मुले आहेत. हिनशराचा कोचीमध्ये पीव्हीसी पाइप्सचे उत्पादन करणारा कौटुंबिक व्यवसाय आहे. ती त्यातदेखील सहभाग घेते. शार्क टँक इंडियाच्या अमन गुप्ता यांनी गेल्या वर्षी ७५ लाख रुपयांची मेनटेनमध्ये गुंतवणूक केली होती. मेनटेनने १.१४ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
कोचीची हिनशरा आणि मुंबईची युबा यांच्यामध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. हिनशरा २५ वर्षांची आहे, तर युबा ३७. मात्र वयाचा फरक असूनही त्यांच्यामध्ये एक उत्तम भावबंध निर्माण झालेला आहे. त्या एक कुटुंब म्हणून काम करतात. वेगवेगळ्या शहरांत राहूनसुद्धा परस्पर विश्वास आणि एकमेकांबद्दल असलेला आदर हा युबा आणि हिनशरा यांच्यामधील पाया आहे. या पायावरच ‘मेनटेन’चा डोलारा उभा आहे.
[email protected]