‘१०० कोटी वसुली फाईल्स’ची स्क्रिप्ट तयार, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
मुंबई : ‘ठगो का मेला’ कार्यक्रमासाठी उबाठाचे टोमणेसम्राट दिल्लीत पोहोचले आहेत, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे यांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत उद्धव ठाकरेंना चांगलीच चपराक लगावली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी सावरकर सिनेमा पाहावा असं म्हटलं होतं. त्यांच्या तिकीटाची आणि एकट्याला थिएटरमध्ये बसून सिनेमा पाहता येईल याची व्यवस्था मी करतो, असं ते म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूरला जावं असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्विटर पोस्ट
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स मीडियावरून प्रत्युत्तर देत पोस्टमध्ये लिहीलं आहे, मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला’ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला. देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स’ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये.
याशिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स’, ‘खिचडी फाईल्स’, ‘कोविड बॅग फाईल्स’ असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा. बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.