यशश्रीने आवाजाच्या दिशेने बघितले, तर तिला एक परीसारखी सुंदर पण थोडी वेगळी बुटकी अशी तरुण स्त्री दिसली. तिचे केस कुरळे व तांबूस होते. नाक खूप नकटे व तोंडही लहानसे होते. तिच्या डोक्यावर दोन तिरपी शिंगे दिसत होती. पाय व हात दोन्हीही आखूड होते. यशश्री तिच्याकडे आश्चर्याने बघत होती. ती होती विज्ञानपरी!!
कथा – प्रा. देवबा पाटील
यशश्री तिला काल तिच्या वडिलांनी दिलेले प्रा. देवबा शिवाजी पाटील यांचे “आकाशाचे गूढ” हे पुस्तक घेऊन आपल्या आजी-आजोबांजवळ गेली व त्यांच्या पलंगावर पडल्या पडल्या वाचू लागली. वाचता वाचताच तिला एक गोड आवाज
ऐकू आला,
“काय वाचते आहेस यशश्री?”
तिने आवाजाच्या दिशेने बघितले, तर तिला एक परीसारखी सुंदर पण थोडी वेगळी बुटकी अशी तरुण स्त्री दिसली. तिचे केस कुरळे व तांबूस होते. शरीर पिवळे होते. डोळे बारीक बारीक, गोल गोल पण घारे घारे होते. नाक खूप नकटे व तोंडही लहानसे होते. त्यामुळे तोंडातील दातही ती बोलताना बारीक कण्यांसारखेच दिसले. डोकेही छाटेसेच होते, पण तिला कानच दिसत नव्हते. बहुधा तिचे कान खूपच लहान असावेत व ते केसांखाली झाकलेले असावेत असे यशश्रीला वाटले. पण तिच्या डोक्यावर दोन छोटी छोटी तिरपी शिंगे दिसत होती. पाय व हात दोन्हीही आखूड होते. हातांच्या खांद्यांवर मात्र हाताच्या मनगटापर्यंत लांब असे छानसे छोटे-छोटे पांढरेशुभ्र पंख होते. हातापायांची बोटे एका पातळ पडद्याने अर्धवट एकमेकांना चिकटलेली दिसत होती. पोषाख छान परीसारखाच पांढराशुभ्र होता. यशश्री तिच्याकडे आश्चर्याने बघत असतानाच तीच पुन्हा यशश्रीला म्हणाली,
“घाबरू नको यशश्री, तू काय
वाचते आहेस?”
“घाबरत नाही मी! माझी आजी आहे ना माझ्याजवळ. मी “आकाशाचे गूढ” हे पुस्तक वाचत आहे. पण तुम्ही कोण आहात? कोठून आलात?” यशश्रीने न घाबरता तिला विचारले, “तुम्ही तर आमच्या पृथ्वीवरील दिसत नाही. पण आमच्या गोष्टीतील पंखावाल्या परीसारख्या; परंतु थोड्या वेगळ्या दिसत आहात.”
“हो. मी परीच आहे. पण तुमच्या गोष्टीतली काल्पनिक परी नाही. मी खरीखुरी परी आहे.” ती म्हणाली.
“काय! खरीखुरी परी! जादूची परी! पण तुमच्या हातात जादूची कांडी तर दिसत नाही. बरं तुम्ही अशा उभ्या का. येथे बसा ना माझ्या पलंगावर.” यशश्री धीटपणे म्हणाली.
“जादूची परी नव्हे, विज्ञानपरी.” परीने तिच्या पलंगावर तिच्याजवळ बसत उत्तर दिले. “विज्ञानपरी, म्हणजे?” यशश्रीने विचारले.
“विज्ञानपरी म्हणजे विज्ञानावर श्रद्धा असणारी, जीवनात सतत विज्ञानाचा वापर करणारी परी.” परीने सांगितले.
“मग तुम्ही कोठे राहता?” यशश्रीने पुन्हा विचारले.
“मी “मही” या अतिशय प्रगत ग्रहावर राहते.” परीने सांगितले.
“हा ग्रह तर आमच्या सूर्यमालेत नाही. हे नाव मी आज पहिल्यांदाच ऐकते आहे. कोठे आहे हा ग्रह? आणि तो कसा आहे?” यशश्रीने विचारले.
“आपल्या आकाशगंगेत तुमच्या सूर्यमालेच्या बाजूला जवळच आमच्या “मित्र” नावाच्या तायाची मित्रमाला आहे. ती तुमच्या सूर्यमालेसारखीच आहे. त्यातील “मही” नावाचा ग्रह आमचा ग्रह आहे. त्यावरची मी परी आहे. आमचा ग्रह तुमच्या पृथ्वी ग्रहासारखाच खडक-मातीचा, डोंगर-पठारांचा, नद्या-समुद्रांचा बनलेला आहे. तुमच्या पृथ्वीवरचे व आमच्या मही ग्रहावरचे वातावरणही जवळपास सारखेच आहे. म्हणून पृथ्वीवरच्या व आमच्या मही ग्रहावरच्या सजीवांत जास्त फरक नसून आपण जवळपास सारखेच आहोत. तू आता मला बघतेच आहेस.” परीने सांगितले.
“मग मला तुमच्या मित्रमालेबद्दल माहिती सांगा ना. आजच आम्हाला आमच्या शिक्षिकेने वर्गात आमच्या सूर्यमालेची माहिती शिकविली.”यशश्री म्हणाली.
“सांगते. पण त्याआधी तुला तुझ्या सूर्यमालेची माहिती मला सांगावी लागेल.” ती परी म्हणाली.
“हो. मी सांगते सर्व तुम्हाला. पण मला तुम्ही त्याआधी हे सांगा की, रात्री आकाशात या इतक्या चांदण्या कोठून येतात व दिवसा कोठे जातात?” यशश्रीने विचारले. “आधी तू मला आकाश म्हणजे काय असते हे सांग बरं.” परीने यशश्रीलाच विचारले.
“आपणास डोळ्यांनी दिवसा जे दिसते तेच आकाश असते. आकाशात खूप आकाशगंगा आहेत. प्रत्येक आकाशगंगांमध्ये असंख्य तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रहही आहेत. त्यातच उल्का, व धूमकेतूसुद्धा आहेत. पण दिवसा सूर्यप्रकाशामुळे ते आपणास दिसत नाहीत.” यशश्रीने उत्तर दिले.
“शाब्बास.” परी आनंदाने उद्गारली, “तुला तर खूपच माहिती आहे ग.” परी पुढे म्हणाली, “तसेही आजच तू हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आहे. तरी आता मी तुला रोज थोडी थोडी महिती
सांगत जाईल.”
अशा प्रकारे त्या दोघींचा त्या दिवसापासून आकाश गप्पांना शुभारंभ झाला.