Tuesday, April 29, 2025

कोलाज

काव्यरंग

काव्यरंग

सही

‘सही’ ज्याला येत नाही जगी त्याचे महत्त्व काय? ‘सही’मध्ये लपून बसतात अनेक हात अनेक पाय ‘सही’मध्ये लपतात काही बोकोबाच्या लांब मिशा ‘सही’ म्हणजे रेघोट्यांनी काढलेल्या ऊठबशा ‘सही’मध्ये लपून बसतो वेटोळ्याचा मोठ्ठा साप ‘सही’ म्हणजे अक्षरांची वेडीवाकडी सुंदर छाप ‘सही’ म्हणजे म्हातारीचे पिंजारलेले पांढरे केस ‘सही’ म्हणजे नकाशाच चित्तारलेला नवा देश ‘सही’ म्हणजे नाक डोळे ‘सही’ म्हणजे कान शेपूट पहिले सोडून शेवटच्यांना ‘सही’त असते अक्षर सूट ‘सही’ वाटते म्हाताऱ्याच्या डोईवरला गोल फेटा ‘सही’ म्हणजे मोळी बांधेल अक्षरांचा लाकूडफाटा ‘सही’ म्हणजे सापशिडी ‘सही’ असते वावटळ गोल ‘सही’मध्ये दडून असतो अर्थ गहिरा खूप खोल ‘सही’त खरंच दिसून येते चित्रकला बाळाची ‘सही’ असते ओळख आपल्या वर्तमान काळाची - भानुदास धोत्रे, परभणी

माझे घर

बांधाबांधावर कोकिळ गान कोकणच्या भूमीला ईश्वरीय दान... उगवतीच्या सूर्याला वासुदेवाची हाक नित्यनेमे देवाची करुणा भाक... वाड्याला खेटून ऐसपैस लांब वाशात दडले पोलादी खांब... सोनियाचे द्वार मागे परसदार माजघर देवघर खोल्या भारंभार.. कौलारू घरांना लाल रंग काम सोनमुख मातीला दुप्पटीने दाम... जाईभोवती जुई फुलून येई मोगऱ्याच्या ताटव्याला फुलण्याची घाई... रांगोळी शेजारी पणत्यांना आस घरकुलात होतो विठ्ठलाचा भास... - पूजा काळे  
Comments
Add Comment