बरेचदा लोकांच्या बदल्या होतात व ते घर व देव सोडून जातात. नवीन घरात प्रवेश करणाऱ्यांना या देवांचे काय करायचे? असा प्रश्न पडतो. घरातील फोटो-फ्रेम जुन्या होतात, त्याच्या आतील कागद खराब होतो. तेव्हा दुसरा कुठलाच उपाय न सुचल्यामुळे लोक मूर्ती, फोटो-फ्रेम रस्त्यांवरच्या कट्ट्यांवर, कानाकोपऱ्यांत ठेवून येतात. याच वाऱ्यावरच्या देवांसंदर्भात ‘सम्पूर्णम्’ या संस्थेची स्थापना २०१९ या वर्षी झाली. संपूर्ण भारतभरातून कुरिअरने त्यांच्याकडे जुने फोटोज, मूर्त्या अशा वस्तू येतात.
ओंजळ – पल्लवी अष्टेकर
आपण रस्त्यावरून येता-जाता अनेकदा मोठ्या झाडांच्या आडोशाखाली, खोडांवर अनेक देव-देवतांच्या मूर्ती बघतो. त्यातील काही मूर्ती सुबक, सुंदर असतात, तर काही मोडक्या-तोडक्या अवस्थेत असतात. गणपती, मारुती, सरस्वती, शंकर अशा एक ना अनेक मूर्ती पाहून मन हळवे होते. असे वाऱ्यावरचे देव पाहिले की आपल्या मनात अनेक विचार येऊ लागतात. या देवांना कोणी सोडले असेल?
बरेचदा लोकांच्या बदल्या होतात व ते घर व देव सोडून जातात. नवीन घरात प्रवेश करणाऱ्यांना या देवांचे काय करायचे असा प्रश्न पडतो. घरातील फोटो-फ्रेम जुन्या होतात, त्याच्या आतील कागद खराब होतो. तेव्हा दुसरा कुठलाच उपाय न सुचल्यामुळे लोक मूर्ती, फोटो-फ्रेम रस्त्यांवरच्या कट्ट्यांवर, कानाकोपऱ्यांत ठेवून येतात. काही वेळा लोक आपल्या आयुष्यातील संकटांसाठी व दुःखांसाठी परमेश्वराला जबाबदार धरतात व मागचा-पुढचा विचार न करता ते देव झाडाखाली सोडून येण्याचे कृत्य करतात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “सृष्टीचे चक्र निसर्गनियमानुसार सुरू असते. ज्याचे कर्म जसे, तसे त्याचे भोग.” त्यामुळे आपल्या भोगांचे खापर देवावर फोडून, देवांना सोडून देणे चुकीचे नाही का? मूर्ती भंग पावल्यावर ‘देव आपल्यावर कोपेल या भीतीपोटी अनेकजण घाबरतात. उलटपक्षी परमेश्वर आपल्यावर प्रेमच करतो. देवांना घाबरायची गरज नाही, कारण परमेश्वर निर्गुण आहे. मात्र या समस्येवर काही तोडगा शोधणं जरूरीचे आहे.
या संदर्भात मी ‘सम्पूर्णम्’ या संस्थेच्या प्रकल्प प्रमुख तृप्ती गायकवाड यांच्यासोबत चर्चा केली. तृप्ती या वकीलही आहेत. तृप्ती यांचे काम खरोखरंच आगळे-वेगळे आहे. ‘सम्पूर्णम्’कडे लोक नको असलेल्या मूर्त्या, घरातील जुने फोटोज कुरिअर करतात. सम्पूर्णम् या संस्थेची स्थापना २०१९ या वर्षी झाली. भारतभर या संस्थेचे अडीशचे ते तीनशे स्वयंसेवक आहेत. संपूर्ण भारतभरातून तसेच महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मुंबई इ. गावातून कुरिअरने त्यांच्याकडे जुने फोटोज, मूर्त्या अशा वस्तू येतात. अलीकडे भारताबाहेरूनही अशा गोष्टी येतात. तालुका ‘येवले’ येथे हे काम सुरू आहे. आतापर्यंत अंदाजे दीडशे टनांपर्यंत लाकडी फ्रेम्स व मूर्त्या ‘सम्पूर्णम्’द्वारा पुनर्वापरासाठी गेल्या आहेत. यातील ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिसने’युक्त वस्तूंचे विघटन करणे त्रासदायक आहे. त्यामुळे कुणाला ना कुणाला तरी ही जबाबदारी घेणे जरूरीचे होते. ही जबाबदारी तृप्तीताई आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पेलवत आहेत.
तृप्ती धार्मिक प्रवृत्तीच्या घरात वाढल्यामुळे घरातील मंदिरांचे महत्त्व त्या जाणतात. देव-देवतांच्या फोटो-फ्रेम्स सुंदर मूर्तींसह सजविणे ही एक विधी बहुतांशी प्रत्येक भारतीय कुटुंबांमध्ये पाळला जातो; परंतु कालांतराने या मूर्ती व फ्रेम खराब होतात व टाकून द्याव्या लागतात. अशा वेळी घरातून टाकून दिलेल्या धार्मिक कलाकृतींच्या प्रत्येक कणाचा पुनर्वापर करून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी ‘सम्पूर्णम्’द्वारा घेतली जाते. सम्पूर्णम् या फाऊंडेशनचा एक सार्वजनिक व्हाॅट्सअॅप ग्रुप आहे, जिथे त्यांच्या ड्राॅपच्या ठिकाणांची सर्व माहिती व सामग्री गोळा करण्यासाठी येणाऱ्या टेम्पोची वेळ व तपशील ठेवतात. संग्रह पूर्ण झाल्यानंतर देवतांचे आभार व पूर्वजांना आदर देण्यासाठी एक छोटा धार्मिक समारंभ आयोजित केला जातो व उत्तरपूजा केली जाते.
तृप्ती म्हणाल्या, “मग पृथक्करणाची प्रक्रिया सुरू होते. यात धातू, लाकूड, काच व कागदापासून सर्व काही वेगळे केले जाते व पुनर्वापरासाठी पाठवले जाते. फ्रेम्समधील लाकूड व प्लाय हे सुंदर पक्ष्यांची घरटी बनविण्यासाठी वापरले जातात. तसेच ज्यांना कच्च्या लाकडाची गरज असते, असे लोक ‘सम्पूर्णम्’कडून ‘लॅमिनेटेड फोटो फ्रेम्स’ घेऊन त्याचा पुनर्वापर करतात. ग्लास देखील काचेमध्ये बनविण्यासाठी द्रवीकृत आहे. त्याचप्रमाणे धातू वितळवून मोल्ड्स, कटलरी इ. तयार करतात, ज्याचा पुनर्वापर होऊ शकतो. अनेक लोक देवांची वस्त्रं आणून देतात. त्यांना क्रश करून त्यापासून ब्लॅँकेट्स बनवली जातात व ती गरिबांना वाटली जातात.
मी तृप्तींना विचारले की, “असे प्रेरणादायी काम करण्याची इच्छा तुम्हाला कशी झाली?” तेव्हा त्या म्हणाल्या, “मला असे वाटते की, जणू मला परमेश्वरानेच असे काम करण्याची इच्छा दिली. एकदा एक व्यक्ती फोटो फ्रेम्स यांचे पाण्यात विसर्जन करीत होती. तेव्हा मी त्या व्यक्तीपाशी जाऊन म्हटले की, या फोटो फ्रेम्समधील ऊर्जा आपल्याला भेटावी. तुम्ही विसर्जन न करता या फोटो फ्रेम्स मला द्याल का? आणि त्या व्यक्तीने या फोटो फ्रेम्स मला दिल्या. तेव्हापासून मला खात्री पटू लागली की, नक्कीच माझे काम योग्य दिशेने चालले आहे.” असंख्य नको असलेल्या गोष्टींचे लोक पाण्यात विसर्जन करतात. त्यामुळे जलप्रदूषण होते.
तृप्ती म्हणतात, “या मूर्त्या अशाच पडून राहण्यापेक्षा मी हे धाडसी पाऊल उचलले. परमेश्वराकडून याकामी मला भरपूर सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली आहे, त्याचा उपयोग याकामी तर मला झालाच, शिवाय त्यामुळे घरातल्या समस्याही कळत-नकळतपणे कमी झाल्या.”
सम्पूर्णम् ही संस्था ‘नो प्राॅफिट व नो लाॅस’ या तत्त्वावर चालते. ‘सम्पूर्णम्’बरोबर टाय अप असलेल्या कंपन्या ठरलेल्या किमतीप्रमाणे विघटन केलेल्या वस्तू घेऊन जातात. आतापर्यंत ‘सम्पूर्णम्’ने दहा हजारांहून अधिक फ्रेम्स व मूर्तींचे पुनर्वापर केले आहे. लोकांमध्ये या कामाबाबत जाणीव निर्माण करणे महत्त्वाचे आहे. हे काम पुढे नेणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे याबाबत आपण एकजुटीने सकारात्मक पद्धतीने काम करू या असे तृप्तीताई म्हणतात.
‘सम्पूर्णम्’चा आणखी एक उद्देश म्हणजे ‘महिला सक्षमीकरण’ असाही आहे. यात पुनर्नवीकरण केलेल्या सामग्रीसह होम डेकोर उत्पादनांचाही समावेश आहे. ज्या महिलांना घराबाहेर पडता येत नाही, त्यांच्यासाठी सक्षमीकरण करण्याच्या हेतूने याची सुरुवात केली जाते. या महिलांना ‘सम्पूर्णम्’द्वारे वस्तू सजविण्यासाठी व रंगविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्यांना रोजचे वेतन मिळेल व आत्मनिर्भर असण्याबद्दल समाधानाची भावना मिळेल.
तृप्ती म्हणतात, “आम्हाला सामान्य लोकांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे मोठ्या जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी आम्ही सर्वसामान्यांची मदत घेणार आहोत.”
‘सम्पूर्णम्’च्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!