Saturday, June 21, 2025

नोकरीसाठी अत्याचार

नोकरीसाठी अत्याचार

क्राइम - अ‍ॅड. रिया करंजकर


समाजामध्ये तरुण-तरुणी सुशिक्षित झालेले आहेत. पण दुप्पट पटीने बेरोजगारी वाढलेली आहे. शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नाही. मिळाली नोकरी, तर पगार व्यवस्थित नाही. पगार व्यवस्थित असेल, तर कामाचा लोड शरीराला न परवडणारा असा आहे. नोकरी म्हणजे तारेवरची कसरत झालेली आहे. मिळेल ती नोकरी आजकालची तरुणपिढी करायला लागलेली आहे. नोकरी टिकवण्यासाठी तेवढी त्यांची धडपड चालू आहे. या नोकरीसाठी तरुणांना अनेक प्रकारचे आयुष्याशी तडजोड करावी लागत आहे.


एका नामांकित शैक्षणिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकऱ्या या टेम्परवारी पद्धतीने व काही परमनंट पद्धतीने दिल्या जात होत्या. इन्स्टिट्यूट ही चांगली आहे, पगार व्यवस्थित देतेय म्हणून त्या ठिकाणी अनेक तरुण टेम्परवारी का होईना पण काम करत होते. काही काळानंतर या टेम्परवारीवरील लोकांना तिथे परमनंट केलं जात होतं. या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील मुलं त्या ठिकाणी येत असत. त्या शैक्षणिक वर्षासाठी त्या मुलांची फी ही भरघोस प्रमाणात आकारली जात होती. या इन्स्टिट्यूटमध्ये एक उच्चपदीय अधिकारी होता की ज्याच्या हातामध्ये कोणाला नोकरी द्यायचं, कोणाला परमनंट करायचं, कोणाला टेम्परवारी करायचं ही जबाबदारी होती. अभिज्ञा नावाची तरुणी तिथे उच्च पदावर कार्यरत होती. तिने तिथे ओळखीने आपल्या भावालाही टेम्परवारी बेसवर कामाला ठेवलेलं होतं. उच्च पदावर असलेला जो अधिकारी होता. त्याला ही गोष्ट माहीत होती की, अभिज्ञाचा भाऊ हा टेम्परवारी बेसवर कामाला आहे. त्याने अभिज्ञाला बोलावलं व सांगितलं की, तुझ्या भावाला जर परमनंट करायचं असेल, तर माझ्या गरजा तुला पुरवायला लागतील. तिलाही या गोष्टीचा सुरुवातीला धक्काच बसला. पण भावाचं आयुष्य या नोकरीवर अवलंबून होतं. त्यामुळे आपल्या भावाला कायमची नोकरी तरी मिळेल या गोष्टीचा तिने विचार केला व अधिकारी सांगेल तसं वागायचं असं तिने ठरवलं. तो अधिकारी जिथे जाईल म्हणजे दिल्लीला जाईल, हैदराबादला जाईल तिथे तो अभिज्ञाला आपल्यासोबत कामानिमित्त घेऊन जात होता व तिच्यावर त्या त्या ठिकाणी तो अत्याचार करत होता. अनेक महिने ती अत्याचार सहन करतच राहिली. पण तिच्या भावाला तो अधिकारी काही परमनंट करत नव्हता. ती या गोष्टीबद्दल विचारत असे त्यावेळी, ‘जेव्हा वरून आदेश येतील तेव्हा आपण करू’ अशी कारणं तो तिला देत होता.


एक दिवस त्या अधिकाऱ्यांनी अभिज्ञाच्या भावाला कामावरून काढून टाकले. अभिज्ञाने विचारले, तर कारण सांगितलं की, ‘वरून आदेश आलाय जे टेम्परवारी आहेत त्यांना त्यांचं अ‍ॅग्रीमेंट संपल्यावर काढून टाका. त्याला मी काय करू’ असं त्यांनी उत्तर दिलं. त्या अधिकाऱ्याच्या बायकोला या गोष्टी माहीत होत्या. तिने तिला अशी धमकी दिली की तुझे फोटो मी इन्स्टिट्यूटमध्ये व्हायरल करेल व तुझी बदनामी करेन. त्यावेळी अभिज्ञाला समजलं की, तो अधिकारी आणि त्याच्या बायकोला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. या अधिकाऱ्यांनी माझे लैंगिक शोषण केलेले आहे. स्वतःच्या समाधानासाठी आणि माझ्या भावाला काही परमनंट केलेलं नाही, या गोष्टीचा तिला नंतर पश्चाताप झाला आणि तिने हिम्मत एकटवून आणि घरच्यांच्या सोबतीने त्या अधिकाऱ्याविरोधात पोलीस तक्रार केली. त्या अधिकाऱ्याला त्या इन्स्टिट्यूटमधून काढून टाकण्यात आले आणि त्याच्या धमकी देणे, फसवणे, बलात्कार करणे अनेक गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली.
नोकरीच्या नावाखाली आजही अनेक महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केले जात आहे. हे करणारे त्या ठिकाणचे अधिकारी किंवा सहकारी असतात. समाजसुधारक झालेला आहे. पण समाजातील बुरसटलेले विचार मात्र सुधारत नाहीत.


(सत्यघटनेवर आधारित)

Comments
Add Comment