हलकं-फुलकं – राजश्री वटे
जरा हात दे बरं
उठून बसावं जरा
झोपून कंटाळा आला…
हाताचा आधार घेऊन बाल्कनीत येऊन उभं राहिलं की, बरं वाटतं रस्त्यावरची वर्दळ बघायला! तेवढ्यात त्या गर्दीतून एक ओळखीचा हात हलला, बाल्कनीतूनही हात हलवला. या दोन हातांची एकमेकांना साद घालणं ही एक दुसऱ्याला साथ देण्याची समर्पक खूण असते. माणसांच्या गर्दीतही हात देणारा कोणीतरी आहे, हा पण एक मानसिक आधार असतो. मनाच्या हाताचा आधार घेत भूतकाळात वळून पहावं… लहान बाळाला याच हातांनी न्हाऊ-माखू घातलेलं असतं, भरवलेलंसुद्धा असतं, हाताचा पाळणा करून झोपवलेलंही असतं. लहान जीवाला या दोन हातांचा आधार असतो. हाताचं बोट धरून ठुमकत चालणारं बाळ कसं गोड दिसतं, आनंदाने टाळ्या वाजवतं, दोन हातांनी!
जसं आयुष्य पुढं सरकत जातं तसं हातांची कर्तव्य, क्रिया बदलत जातात. जरा आठवणींचा हात धरून दोन पावलं पुढे जाऊन पाहू. जीवाभावाची मैत्री व्हायचं ते वय एकमेकांच्या खांद्यावरचे हात घट्ट मैत्रीची साक्ष देतात! मेहनत करून यशाकडे वाटचाल सुरू होते. हातांना कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव व्हायला लागते. मोठ्यांपुढे नमस्कारासाठी जुळतात, आशीर्वादाचा हात सदैव डोक्यावर राहतो! कलेचं वरदानही या हातांना असतं. या हातांनी अचंबित करणाऱ्या सुंदर कलाकृती साकारल्या जातात. त्या सुंदर कलाकृती बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते.
सप्तपदीला दोन जीवांचा हातात हात असतो. एक मेंदीने रंगलेला, तर दुसरा कर्तव्याच्या जाणिवेचे भार सांभाळण्याच्या तयारीत असतो. या हातांनी नेहमी चांगले कर्म व्हावे यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवून वचन घेतले जाते.
जसं जसं प्रौढत्वाकडे पावले सरकतात तसे आधारासाठी हात लागतो. हाताला हात देणारे कायम पुढे असायचे, पण आज परिस्थिती कशी बदलत चालली आहे. आज सुखाच्या क्षणी टाळ्या वाजवून आनंद साजरा करतात, तर दु:खात अश्रूही पुसतात व एकमेकांना घट्ट धरून ठेवतात, स्वत:लाच स्वत:चा आधार देत! निशब्द असलेल्या हातांचा स्पर्शसुद्धा खूपदा पुरेसा असतो, न बोलताही खूप काही सांगून जातो. अडचणीत पुढे आलेला हात म्हणजे ओंजळभर आनंद. ते म्हणतात ना
‘देणाऱ्याने देत जावे’ या दोन हातांना मनापासून नमस्कार.