जहाजासह २३ पाकिस्तानी क्रू मेबर्सचीही सुटका
मुंबई : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपलं महत्त्व सिद्ध केलं आहे. नौदलाने अपहरणाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडत समुद्री चाच्यांच्या तावडीतून एका इराणी जहाजाला यशस्वीरित्या सोडवले. इराणी जहाजासह इंडियन नेव्हीने २३ पाकिस्तानी क्रू मेबर्सनांदेखील सुरक्षितपणे वाचवले. तब्बल १२ तासांहून अधिक वेळ राबवलेल्या या ऑपरेशनबद्दल नौदलाने माहिती दिली आहे.
नौदलाला २८ मार्च रोजी संध्याकाळी समुद्री चाच्यांनी इराणच्या मासेमारी करणाऱ्या अल कंबार ७८६ हे जहाज ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नौदलाने त्यांच्या सुटकेची मोहिम सुरु केली होती. या माहितीच्या आधारे भारतीय नौदलाने आयएनएस सुमेध आणि आयएनएस त्रिशूल या दोन युद्धनौका त्या जहाजाच्या दिशेने वळवल्या. या दोन्ही युद्धनौका अरबी समुद्रात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आल्या होत्या.
भारतीय नौदलाने एडनच्या खाडीजवळ समुद्री चाच्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि १२ तासाहून अधिक तासांच्या कारवाईनंतर २३ पाकिस्तानी नागरिक चालक दलाला भारतीय नौदलाने रेस्क्यू केले. तसेच इराणी मासेमारी जहाज अल कंबर ७८६ वरील समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले. या घटनेवेळी जहाज सोकोट्रापासून तब्बल ९० एनएम दक्षिण पश्चिमेत होते आणि समुद्री चाचे या जहाजावर होते.
दरम्यान, काही वेळातच आयएनएस त्रिशूल देखील या ठिकाणी दाखल झाले. अखेर १२ तासांचे ऑपरेशन राबवल्यानंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे आत्महसमर्पण केले. तसेच या बोटीवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली. अपहरण झालेल्या एफव्हीला २९ मार्च रोजी थांबवण्यात आले, असे नौदलाने निवेदनात सांगितले.