Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभारतीय राजकारणात दुःशासन जिवंत आहेत!

भारतीय राजकारणात दुःशासन जिवंत आहेत!

रवींद्र मुळे, अहमदनगर

होलिका दहन म्हणजेच आपल्यामधील विकृत गुणांचा त्याग करण्याचा, समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्याचा संपवण्याचा हा दिवस! अशा या दिवशी भारतीय राजकारणातील एक अत्यंत बीभत्स अध्याय लिहिण्याची बुद्धी काही मंडळींना यावी यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे?

संदर्भ आहे तो आज काँग्रेस आयटी सेलच्या प्रमुख सुप्रिया, ज्या की त्या पक्षाच्या आक्रमक राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. यांच्या ट्विटर, इंस्टाग्राम हॅण्डलवरून आणि अहिर नावाच्या किसान मोर्चाच्या अध्यक्षाकडून कंगना राणावत या सिने अभिनेत्रीबद्दल व्यक्त केलेली प्रतिक्रिया! आता त्यावर सफाई देणे सुरू झाले आहे आणि त्यात ही काँग्रेस मंडळी अजूनच स्वतःच्या प्रतिगामी वृत्तीला उघडे करत आहेत.

हिंदुत्व चळवळीला, त्या विचाराच्या राजकीय पक्षाला, कार्यकर्त्यांना ‘मनुवादी’ म्हणण्याची एक पद्धत गोबेल्स प्रचाराचे तंत्र वापरून भारतात काही लोकांनी रूढ केली होती. मनुस्मृती त्यात महिलांना कसे कमी लेखले गेले आहे, हिंदू श्रद्धेने महिलांना नेहमीच अपमानित केले आहे असे दाखले देणारे पुरोगामी, लुटियनस, लिब्रांदू भारतात कमी नाहीत. (अर्थात सर्व वेद, उपनिषद कालीन संदर्भापासून अलीकडील ऐतिहासिक संदर्भाने स्त्री गौरव करणारे असंख्य पुरावे दिले आहेत.) पण हेच वेळ आल्यावर आपली नारीशक्ती विरोधी वृत्ती कशी व्यक्त करतात याचे हे उदाहरण आहे.

त्यातही स्वकर्तृत्वावर जर कुणी महिला पुढे येत असतील तर त्यावर अभद्र टिकाटिपणी करण्याची एक मानसिकता आहे. यांची महिलाविषयक सहानुभूती आणि आदर भावना अत्यंत सापेक्ष आहे. व्यक्ती सापेक्ष, स्थिती सापेक्ष, विचार सापेक्ष आहे. त्यामुळेच कंगना राणावतसारखी अत्यंत विपरीत परिस्थितीत सिनेसृष्टीतील सर्व अपप्रवृत्तीला तोंड देत स्वतःचे स्थान जेव्हा निर्माण करते तेव्हा तिचे कौतुक तर सोडून द्या पण हिंदुत्व, मोदी यांच्याबद्दल तिने घेतलेल्या भूमिकेबद्दल चवताळून विरोध करणारे, उखाडून टाकले अशी भाषा वापरणारी जी वृत्ती महाराष्ट्रात अस्तित्वात आहे ती वृत्ती आणि मंडीचा भाव विचारणारे ट्वीट करणारी वृत्ती यात काही फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

कुठल्याही क्षेत्रात कितीही स्त्री सबलीकरण आणि स्त्रीशक्तीची भाषा बोलली जात असली तरी जेव्हा प्रत्यक्षात एखादी स्त्री आपले स्वतःचे स्थान स्वकर्तृत्वावर निर्माण करते किंवा त्या स्त्रीच्या कर्तृत्वामुळे पुरुषांचा अहंगंड दुखावतो, त्यावेळी त्या स्त्रीच्या शरीराबद्दल, चारित्र्याबद्दल, पोषाखाबद्दल बोलण्याची जी सरंजामी वृत्ती आहे ती वृत्ती संजय राऊत गँगने काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आपल्या सत्तेच्या मस्तीमुळे प्रकट केली होती आणि आज काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या ट्विटद्वारे तीच वृत्ती प्रकट केली.

मंडी हे कंगना राणावत यांचे जन्मगाव! त्या मंडीचा वेगळा अर्थ लावत कंगना राणावत यांना तेथील तिकीट घोषित झाल्यावर या पुरुषी मनोवृत्तीला कुठले दर आठवले आहेत? स्त्री ही उपभोगाची वस्तू मानणारी काँग्रेसी वृत्ती असेल, तर राजकारणातून ही वृत्ती हद्दपार करण्याची वेळ आली आहे. असे ट्वीट करताना यांना आपली आई, बहीण आठवू नये ही त्यांच्या संस्काराने त्यांना दिलेली विस्मरणाची देणगी म्हणावी लागेल. त्यातून ही मानसिकता निर्माण होत आहे. ही मानसिकता शक्तीचा संदर्भ देताना हिंदू धर्मातील शक्तीचा उल्लेख करते. या मानसिकतेला अयोध्येमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन गेलेली नसताना नाचताना दिसते. हीच मानसिकता येथील राजकीय पक्षाच्या कार्यालयात महिलांवर होणाऱ्या अत्याचारबद्दल सोयीस्कर मौन धारण करते. हीच मानसिकता स्मृती इराणी यांच्याबद्दल वाईट बोलून निर्लज्जपणाचे प्रदर्शन करते. हीच मानसिकता एके काळी जयाप्रदा यांच्याबद्दल बोलते. हीच मानसिकता दिग्विजय सिंग यांच्या तोंडी टंचसारख्या अश्लील शब्दांची पखरण करते. हीच मानसिकता लव्ह जिहादमधील बळी जाणाऱ्या भगिनींबद्दल अलिप्त होते. हीच मानसिकता शाहबनोला पोटगी नाकारते आणि ट्रीपल तलाक रद्द करण्याचा विरोध करते. हीच मानसिकता दुर्गापूजा नाकारून महिषासूर वृत्तीचा गौरव करते, हीच मानसिकता नवरात्राचा विकृत अर्थ सांगत आमच्या देवींची टिंगल करते.

नको तेव्हा डरकाळ्या फोडणाऱ्या जया भादुरी कुठे गेल्या? संदेश खाली असो किंवा कंगना राणावतवरील अभद्र ट्वीट यांचा स्त्री दृष्टिकोन सिलेक्टीव्ह आहे. जे जया भादुरी, तेच स्वरा भास्कर किंवा शबाना आझमीबद्दल. राष्ट्रपतीपदक विजेती एक अभिनेत्री स्वकर्तृत्वावर मोठी होते आहे, तर विचारातील भिन्न प्रवाह बाजूला ठेवून तिच्या स्त्रीत्वाचा होणारा अपमान समस्त स्त्री वर्गाचा आहे ही भूमिका या स्वतःला स्त्रीवादी, पुरोगामी अभिनेत्री घेणार का? वास्तविक नृत्य, गायन, नाट्य, सिनेमा, अभिनय ह्या एकूण ६४ कला प्रकारातील कला आहेत ना? यामध्ये स्त्री अथवा पुरुष यांना स्वतःचे प्रभुत्व सिद्ध करण्याचा अधिकार आहे ना? हे सिद्ध करत असताना त्यांची स्वतःची काही सामाजिक, राजकीय मते असणे हा गुन्हा नाही ना? इतके दिवस या क्षेत्रातील दिग्गज बहुतांश एका दिशेने विचार करणारे होते आता त्यातील काही जर हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय स्त्री दृष्टिकोन या बाजूने विचार मांडत असतील, तर त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा परवाना कुणाला मिळाला आहे का? राजकीय, सामाजिक जीवनात महिलांची अशा प्रकारे बदनामी करणारी ही दुःशासन वृत्ती कधी नष्ट होणार?

सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, प्रियंका वड्रा यांच्यासह राजकारणात ऊठसूट गप्पा मारणाऱ्या मोदी विद्वेष हाच ज्यांचा आधार आहे, अशा सगळ्या महिला याबाबतीत काय भूमिका घेणार? ज्या लोकांनी अशा प्रकारे स्त्रीत्वाचा अपमान केला त्या लोकांना आपल्या पक्षात ठेवणार की काढून टाकणार? याबद्दल तमाम भारतीय महिलांची माफी मागणार की निर्लज्जपणे सफाई देणार? याचा साधा निषेध तरी करणार का? निर्भय बनोचा आव आणणारे महाराष्ट्रातील पळपुटे योद्धे जमलेल्या तुरळक लोकांना संबोधन करताना त्यातील महिलांना सांगतात मोदी आले तर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले तुमचे अधिकार जातील. कारण मोदी यांना स्त्रियांना मध्ययुगीन काळात न्यायचे आहे. यांचे असीम मौन आता अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. असल्या अश्लील ट्वीटबद्दल यांची तोंडे आता शिवली आहेत का? अर्थात या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण या प्रवृत्ती जुन्याच आहेत. महाभारत काळात दुःशासन वृत्तीने द्रौपदीचे वस्त्रहरण केले. कर्णाने, दुर्योधनाने द्रौपदीचा अपमान केला. ही सर्व वृत्ती आज भारतीय राजकारणात अजून जिवंत आहे.

स्त्री अपमान रामायण, महाभारत घडवते आणि कंगना राणावत या अभिनेत्रीचा अपमान हा या निवडणुकीत एक नवीन महाभारत घडवणार आहे. कारण भारतातील तमाम महिला मतदार या क्षुब्ध झाल्या आहेत आणि त्या अशा वृत्तीला सर्वत्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. महाभारतात द्रौपदीचा झालेला अपमान पुसून काढण्यासाठी पाच पांडव आणि एक युगंधर सिद्ध होते. त्यासाठी १२ वर्षे वाट बघितली, पण कीचक, जरासंध, दुःशासन यांना योग्य ते शासन दिले. आता होणाऱ्या महाभारतात १२ आठवडे पण वाट पाहावी लागणार नाही. प्रत्येक मतदार हा पांडवांच्या भूमिकेत सैरेंध्री यांचा अपमान पुसून टाकतील आणि त्यासाठी मोदीरूपी एक युगंधर पुरेसा आहे. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीच्या वेळेस डॉ. रफिक झकेरिया यांनी तुरुंगात मृणाल गोरे यांचे गाल अजून लाल कसे झाले? असा प्रश्न विचारून अभद्र टिप्पणी केली होती. जनतेने त्याची परतफेड त्यांचे राजकीय जीवन संपवून व्याजासहित केली होती. कंगना राणावतवरील ही टिप्पणी मोदींना ४०० पार तर नेईलच पण काँग्रेसला किती खाली नेईल हे ४ जूनला निश्चित कळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -