Thursday, May 22, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

Maza purskar : ‘माझा पुरस्कार’साठी एप्रिल फूलचा योगा‘योग’...!

Maza purskar : ‘माझा पुरस्कार’साठी एप्रिल फूलचा योगा‘योग’...!

  • राजरंग : राज चिंचणकर


सदैव रोखठोक बोलणारे, शाब्दिक फटकेबाजी करणारे आणि कायम पांढऱ्या शुभ्र पेहरावात नाट्यगृहांवर वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांची ख्याती आहे. त्यांच्या स्वभावधर्मानुसार विविध प्रकारचे सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम ते हाती घेतात आणि कसलीही भीती न बाळगता ते तडीस नेतात. ‘आले स्वतःच्या मना’ या तत्त्वावर अशोक मुळ्ये, म्हणजेच तमाम नाट्यसृष्टीचे लाडके मुळ्येकाका, हे दरवर्षी ‘माझा पुरस्कार’ देत असतात. गेली १५ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमात हा पुरस्कार ‘त्यांना योग्य वाटेल’ त्यांनाच ते देतात आणि हेच या पुरस्काराचे वैशिष्ट्य आहे. या पुरस्काराला त्यांनी दिलेल्या ‘माझा पुरस्कार’ या नावावरून त्याची प्रचिती येतेच. ‘हा पुरस्कार मी देतो म्हणून तो माझा पुरस्कार’, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे आणि आतापर्यंत ते तसे कायम पाळत आले आहेत. अशोक मुळ्ये यांचा चाहतावर्ग त्यांच्या या पुरस्कार सोहळ्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहात असतो.



यंदा हा पुरस्कार देण्यासाठी त्यांनी चक्क १ एप्रिल म्हणजे ‘एप्रिल फूल’चा योग साधला आहे. त्यामुळे, अनेक अचाट व अफलातून संकल्पना गाठीशी बाळगून असलेल्या अशोक मुळ्ये यांचा त्यात काही वेगळा उद्देश नसेलच असे ठामपणे काही सांगता येणार नाही, अशी चर्चा नाट्यकट्ट्यांवर आहे. इतर सर्व दिवस सोडून त्यांनी या सोहळ्यासाठी अगदी हाच मुहूर्त का निवडला असावा, असा प्रश्न त्यांना ‘ओळखून असलेल्या’ अनेकांना पडला आहे. पण हीच तारीख मोकळी असल्याने नाट्यगृहाने ती तारीख दिली, असे अशोक मुळ्ये यांचे यावर म्हणणे आहे. परिणामी, हा मुहूर्त म्हणजे योगायोग आहे, असे मानण्याशिवाय नाट्यसृष्टीला गत्यंतर नसले; तरी ‘कळते पण वळत नाही’ अशी स्थिती अनेकांची
झाली आहे.



‘ऑस्कर’नंतर लोक ज्या पुरस्काराची वाट पाहतात तो ‘माझा(च) पुरस्कार’ आहे, असे अशोक मुळ्ये यांनी स्वतःच वेळोवेळी जाहीर केले असल्याने; या पुरस्काराभोवती आपोआप वलय निर्माण झालेले आहे. ‘ऑस्कर’मध्ये एकवेळ वादावादी होईल, पण ‘माझा पुरस्कार’मध्ये अजिबात वाद नसतो; असे सांगणारे अशोक मुळ्ये यांनी त्यांच्या स्वभावानुसार यंदाचे पुरस्कार थेट जाहीर करून टाकले आहेत. या वर्षात नाट्यसृष्टीत ज्यांनी ज्यांनी भरीव कामगिरी केली आहे, असे अर्थातच अशोक मुळ्ये यांना वाटते, त्यांनाच नेहमीप्रमाणे ते हा पुरस्कार देणार आहेत; परंतु या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या वर्षी त्यांनी ‘माझा’चा ‘भरतरत्न’ पुरस्कार देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि त्यानुसार त्यांनी हा पुरस्कार अभिनेता भरत जाधव यांना जाहीर केला आहे.



अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ सोहळ्यात सर्वकाही असते. मात्र या सोहळ्याला तमाम लोक जमतात ते फक्त आणि फक्त त्यांना ऐकण्यासाठी! पांढऱ्या शुभ्र पेहेरावातल्या या व्यक्तिमत्त्वाच्या मुखातून उमटणारी ‘अशोक’वाणी ऐकून त्यांच्या चाहत्यांचे कान तृप्त होतात. पण अलीकडेच त्यांनी १०० व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘केळवण’ सहळ्यात मात्र त्यांनी बऱ्यापैकी मौन धारण केले होते. १०० व्या नाट्यसंमेलनाला ज्या मंडळींना जाता येणार नाही; त्यांच्यासाठी त्यांनी स्वेच्छेने तो सगळा ‘उद्योग’ केला होता. पण त्यावेळी त्यांनी फारसा संवाद न साधल्याने, त्यांनी घातलेल्या भोजनाच्या पंगती उठूनही उपस्थितांची पोटे काही भरली नव्हती. साहजिकच, ऐन ‘एप्रिल फूल’च्या दिवशी असलेल्या ‘माझा पुरस्कार’ सोहळ्यात तरी अशोक मुळ्ये यांचे शाब्दिक फटकारे कानी पडतील आणि भोजन व्यवस्था नसूनही उपस्थितांना भरपेट मेजवानी मिळेल; अशी आशा तमाम नाट्यसृष्टी आणि त्यांचे चाहते बाळगून आहेत.

Comments
Add Comment