नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी (Liquor scam) मनी लाँड्रिंगचा (Money laundering) तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाची (ED) जोरदार कारवाई सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कोठडीची मुदतही वाढवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत असतानाच आता त्यात आणखी भर पडली आहे. ईडीने दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत (Kailash Gehlot) यांना समन्स (ED summons) पाठवले आहे. त्यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
कैलाश गहलोत यांच्यावर एक्साइज पॉलिसी ड्राफ्ट तयार केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांचा आरोप आहे की आप नेता कैलाश गहलोत हे देखील त्याच गटाचा भाग होते ज्यांनी या पॉलिसीचा ड्राफ्ट तयार केला होता. इतकंच नाही तर गेहलोत यांच्यावर मद्य व्यापारी विजय नायर याला आपलं सरकारी घर दिल्याचा आरोप देखील आहे.
आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या कोठडीत आहेत. केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत ईडीच्या ताब्यात राहावे लागणार आहे. तसेच कोठडीसाठीच्या नव्या अर्जात ईडीने म्हटले होते की, कोठडीत चौकशीदरम्यान मुख्यमंत्र्यांचे पाच दिवसांचे जबाब नोंदवण्यात आले होते आणि ते उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. ईडीने सांगितले की, कोठडीदरम्यान इतर तीन लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.