मुंबई : मुंबईतील वर्दळीचं स्थानक म्हणून दादर स्थानकाची ओळख आहे. दादर रेल्वे स्थानकावरुन दिवसागणिक लाखो प्रवासी प्रवास करत असतात. तेच दादर रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देणारा धमकीचा फोनकॉल नागपूर पोलिसांना आला होता. नागपूर पोलिसांनी तातडीने ही माहिती मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांना दिली. परंतु तो फोनकॉल फेक असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक देखील केली आहे.
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमार्गाला जोडलेले दादर रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी ११२ या हेल्पलाईन नंबरवरून देण्यात आली होती. प्रवाशांची अधिक रेलचेल असणाऱ्या या स्थानकावर धमकीचा कॉल येताच खळबळ उडाली. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी सतर्कतेने बीडीडीएस पथकासह दादर रेल्वे स्थानकावर कसून तपासणी केली. मात्र कोणत्याही कानाकोपऱ्यात संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान, हा धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीचाही पोलिसांनी शोध घेतला आहे. विकास शुक्ला असे फेक कॉल करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने फेककॉल केल्याचे कारण अद्यापही स्पष्ट केले नाही. परंतु फेककॉल तसेच कोणतीच संशयास्पद वस्तू आढळली नसल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मायानगरी मुंबईत मागील काही वर्षांपासून अशा प्रकारच्या धमकीचे फोन सतत येत आहेत. जून २०२३ मध्येही दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा कॉल होता. त्याप्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यावेळीही मुंबई लोहमार्ग पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली होती. मात्र तपासणीत बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नव्हती.