Sunday, July 21, 2024
Homeक्राईमAlibag crime : खालापूरमधून गावठी रिव्हॉल्व्हरसह पाच जिवंत काडतुसे जप्त

Alibag crime : खालापूरमधून गावठी रिव्हॉल्व्हरसह पाच जिवंत काडतुसे जप्त

एक आरोपी अटकेत, न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सतर्क झाले असून, खालापूरमधून (Khalapur) एका आरोपीकडून गावठी रिव्हॉल्व्हरसह पाच जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी नरेश धोंडू देशमुख याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना २८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खालापूर पोलीस ठाणे हद्दीत चौक फाटा परिसरात एक इसम अवैधरित्या स्वतःकडे गावठी रिव्हॉल्व्हर बाळगून फिरत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन व कर्मचाऱ्यांचे पथक नेमून घटनास्थळी पाठविले. या पथकाने सदर इसमाचा शोध घेतला असता, तो इसम संशयितरित्या फिरताना आढळून आला. पथकाने लागलीच संशयितास ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव नरेश धोंडू देशमुख असे सांगितले. या पथकाने दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी रिव्हॉल्व्हर व पाच जिवंत काडतुसे मिळून आली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं १६२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार सुधीर मोरे करीत असून, या गुन्हयातील आरोपी नरेश धोंडू देशमुख याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता, आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

रसायनी पोलिसांकडून गांजा जप्त

दुसऱ्या घटनेत रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील वाशिवली भागात २८ मार्चला रसायनी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बांगर, सपोनि लहांगे व सहकारी अशी गस्त घालीत असताना दुपारच्या वेळेत वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाविद्यालयाच्या मैदानाच्या बाजूस असलेल्या एका मोहाच्या झाडाजवळ आरोपी ज्ञानेश्वर बालाजी जाधव (वाशिवली, तालुका खालापूर) याच्या ताब्यात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये १ किलो ८५ ग्रॅम वजनाचा गांजा सुट्ट्या स्वरूपात विक्री करताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक करून त्याच्याकडून ११ हजार रुपये किमतीचा गांजा हा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि लहांगे हे करीत आहे. आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून जिल्ह्यात गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तसे आदेश दिलेले आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यात अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ, अवैध मद्य यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या दोन्ही कामगिरी रायगड जिल्हयाचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनी पोमन, सहायक फौजदार राजेश पाटील, प्रसाद पाटील, पोलिस हवालदार संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, झेमसे यांच्या तपास पथकाने केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -