Saturday, May 10, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

घणसोलीत बेकायदेशीररीत्या राहणारे ५ बांग्लादेशी घुसखोर जेरबंद...

घणसोलीत बेकायदेशीररीत्या राहणारे ५ बांग्लादेशी घुसखोर जेरबंद...

दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई युनिटची कारवाई


नवी मुंबई (प्रतिनिधी): घणसोली गावातील शिवाजी तलावाजवळ बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या ५ बांग्लादेशी नागरीकांना दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबईतील विक्रोळी युनिटने शुक्रवारी दुपारी अटक केली आहे. या कारवाईत पकडण्यात आलेले सर्व बांग्लादेशी नागरिक हे मजुरी काम करुन मागील काही वर्षापासून घणसोली तसेच इतर ठिकाणी रहात असल्याचे तपासात आढळून आले आहे.


घणसोली गावालगत असलेल्या शिवाजी तलावाजवळ काही बांग्लादेशी नागरीक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या विक्रोळी युनिटला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाच्या विक्रोळी युनिटने शुक्रवारी दुपारी घणसोली गाव येथील शिवाजी तलावाजवळ बिल्डींग तोडण्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी सदर ठिकाणी अहात जमाल शेख (वय,२२) व रोबुल समद शेख (वय,४०) हे दोन व्यक्ती सदर ठिकाणी बिगारी काम करत असल्याचे आढळुन आले. दहशतवाद विरोधी पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी बांग्लादेशी नागरीक असल्याचे कबुल केले.


आहत जमाल शेख हा दोन वर्षापुर्वी भारतात आल्याचे तर रोबुल समद शेख हा 7 वर्षापुर्वी भारतात आल्याचे व तेव्हांपासून ते घणसोली येथे राहत असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळुन आले. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने नाथ अपार्टमेंटजवळ बिल्डींगचा पाया खोदण्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्याठिकाणी बिगारी काम करत असलेल्या रॉनी सोरीफुल खान (वय,२५), जुलु बिल्लाल शरीफ (वय,२८), मोहम्मद मुनीर मोहम्मद सिराज मुल्ला (वय,४९) या तिघांकडे चौकशी केली असता, त्यांनी देखील बांग्लादेशी असल्याचे कबुल केले. यातील रॉनी हा ६ महिन्यापुर्वी तसेच जुलू बिल्लाल हा पाच वर्षापुर्वी तर मोहम्मद मुनीर हा १३ वर्षांपुर्वी भारतात आल्याचे त्यांच्या चौकशीत उघडकीस आले.


मोहम्मद मुनीर हा १० वर्षे घणसोलीत बिगारी काम करुन घणसोलीत राहिला होता. त्यानंतर तो पुन्हा बांग्लादेशत गेला होता. त्यानंतर दिड वर्षापुर्वी तो पुन्हा भारतात घणसोलीत परतल्याचे चौकशीत आढळुन आले आहे. हे सर्व बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे आढळुन आल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने पाचही जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९२० तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

Comments
Add Comment