दारणा, भाम धरणाच्या साठ्यातही कमालीची घट
नाशिक : तालुक्यातील धरणांचा जलसाठा खालवला आहे. दारणा, भाम धरणाच्या साठ्यात कमालीची घट झाली आहे. भावली धरणात अवघा १३ टक्के, तर मुकणे धरणात ३१.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल व मे मध्ये तालुक्यातील बहुतांश गावांना पाणीटंचाई जाणवते. अनेक वाड्यापाड्यांना दूरवरून पाणी आणावे लागते. कसारा घाट परिसरातील आवळखेड, चिंचलेखैरे या गावांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.
या वर्षीही टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. वैतरणा धरणातून पालघर जिल्ह्याला, तर भावली धरणातून ठाणे जिल्ह्याला पाणी दिले जाते. दोन-चार वाड्यांना धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवली, तर पाणीप्रश्न मिटेल. मात्र, याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील सोनोशी, मायदरा, वासाळी गावांनाही पाणीटंचाई जाणवत आहे. या भागांतही उन्हाळ्याच्या अखेर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या भागातील काही गावांसाठी भाम धरणातून पाणी आंबेवाडी शिवारात घाट माथ्यावर नेऊन स्वतंत्र पाणीयोजना कार्यान्वित आहे. अद्याप योजना अपूर्ण स्थितीत आहे.
तीन महिन्यांचे नियोजन कसे करणार?
तालुक्यातील मोठ्या धरण प्रकल्पांमध्येही महिन्याभरात साठ्यात मोठी घट झाली आहे. दारणा, मुकणे, भाम धरणाचा साठा कमालीचा घटला आहे, तर भावली धरणात जेमतेम १३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. या १३ टक्के पाण्यात आगामी तीन महिन्यांचे नियोजन कसे करावे याची चिंता परिसरातील गावांना व शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.दरम्यान तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच अनेक गावातील महिलांना दूरवरून हंड्याने पाणी उपलब्ध करावे लागत आहे.
धरणांची नावे व साठा (टक्केवारीत)
दारणा : २४.८४
मुकणे : ३१.३६
वाकी: ४४.४६
भाम : २४.६३
भावली : १३.११
कडवा : २५.८३