यशाच्या शिखरावर असलेल्या अमृता खानविलकरने व्यक्त केली ‘ही’ इच्छा
मुंबई : ‘मुंबई सालसा’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अमृता खानविलकर हिने अथक परिश्रमाने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही तिने स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘राझी’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘मलंग’ या चित्रपटांमध्ये तिने महत्तवपूर्ण भूमिका बजावली आहे. सध्या अमृता खानविलकर हिची लुटेरे ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजमधील तिनं साकारलेली “अविका ” ही भूमिका प्रेक्षकांना वेड लावतं आहे. लुटेरे वेब सीरिजनंतर आता अमृताने तिला पुढे काय करायचंय? याबद्दल प्रेक्षकांना एक छोटी हिंट दिली आहे. ही खास गोष्ट नक्की काय आहे? हे बघायला सगळेच उत्सुक आहेत.
प्रत्येक कलाकाराला अभिनयाच्या पलिकडे काहीतरी वेगळं करावं असं वाटत असतचं. अमृता खानविलकर हिच्या बाबतीतही असेच काहीस आहे. अमृता सध्या “लुटेरे” चं प्रमोशन करत आहे. अशाच एका प्रमोशन दरम्यान अमृताने तिला आयुष्यात अजून काहीतरी खास करायचं आहे याबद्दल सांगितल.
विशेष म्हणजे ही हरहुन्नरी अभिनेत्री फक्त अभिनय आणि नृत्यातच पारंगत आहे असं नाही तर अमृता अभ्यासातही कोणाच्या मागे नव्हती. शिक्षणाबद्दल सांगताना अमृता म्हणते, “अभिनय नवनवीन भूमिका प्रोजेक्ट्स सगळंच होत राहणार आहे पण मला अभिनयाच्या सोबतीने मास्टर्स सुद्धा करायचं आहे. मास्टर्स इन लिटरेचर किंवा इन फायनान्स हे अजून ठरवलं नाही पण मास्टर्स करण्याची माझी इच्छा आहे. आपण वर्षभर काम करत असतो पण स्वतः साठी काहीतरी करावं म्हणून मला मास्टर्स करण्याची खूप इच्छा आहे” असे अमृता हिने सांगितले.
अमृता हि आगामी काळात अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्स मध्ये दर्जेदार भूमिका करणार आहे. “कलावती ” , ” ललिता बाबर “पठ्ठे बाबूराव” अशा चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पण आता लुटेरेनंतर अमृता तिचं उच्च शिक्षण पूर्ण करणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.