स्वामी स्मरणानंद यांचे अनंतात प्रस्थान

Share

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लोकसभा निवडणुकीच्या या महापर्वात एक अशी बातमी कानी आली, ज्यामुळे मन आणि विचार काही क्षणांसाठी ठप्प झाले. भारताच्या आध्यात्मिक श्रद्धेचे एक प्रखर व्यक्तिमत्त्व श्रीमत स्वामी स्मरणानंदजी महाराज यांचे समाधिस्थ होणे, ही एक वैयक्तिक पातळीवरील क्लेशदायक गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी स्वामी आत्मास्थानंदजी यांचे महाप्रयाण आणि आता स्वामी स्मरणानंद यांचा अनंताचा प्रवास ही घटना कित्येकांना शोकसागरात बुडवणारी आहे. मी देखील त्यांचे कोट्यवधी भक्त, संतजन आणि रामकृष्ण मठ आणि मिशनच्या अनुयायांइतकाच दुःखी झालो आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या बंगालच्या दौऱ्यावेळी मी रुग्णालयात जाऊन स्वामी स्मरणानंद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. स्वामी आत्मास्थानंद यांच्याप्रमाणेच स्वामी स्मरणानंदजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य, आचार्य रामकृष्ण परमहंस, माता शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी समर्पित केले होते. हा लेख लिहिताना माझ्या मनात, त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी केलेली चर्चा आणि त्या अनेक स्मृती जिवंत होत आहेत.

जानेवारी २०२० मध्ये ज्यावेळी मी बेलूर मठाला भेट दिली, त्यावेळी मी स्वामी विवेकानंद यांच्या कक्षात बसून ध्यानधारणा केली होती. त्या दौऱ्याच्या वेळी मी स्वामी स्मरणानंद यांच्याशी स्वामी आत्मास्थानंदजी यांच्याबद्दल खूप वेळ बोललो होतो.
रामकृष्ण मिशन आणि बेलूर मठ यांच्याशी माझे किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत, ते तर तुम्ही जाणताच. आध्यात्मिक क्षेत्रात जिज्ञासा असल्याने मी पाच दशकांच्या कालखंडात वेगवेगळ्या संत महात्म्यांच्या भेटी घेतल्या आहेत आणि विविध ठिकाणी वास्तव्य देखील केले आहे. रामकृष्ण मठात देखील मला आध्यात्मासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या अनेक संतांचा परिचय झाला, ज्यामध्ये स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. त्यांचे पवित्र विचार आणि ज्ञानाने मला नेहमीच एक समाधान लाभले आहे. जीवनातील या सर्वात महत्त्वाच्या कालखंडात अशाच संतांनी मला जन सेवा हीच ईश्वर सेवा असल्याची शिकवण दिली.  स्वामी आत्मास्थानंदजी आणि स्वामी स्मरणानंदजी यांचे आयुष्य, रामकृष्ण मिशनच्या ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धितायच’ या तत्त्वाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

शिक्षण प्रसार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत रामकृष्ण मिशन करत असलेले कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. रामकृष्ण मिशन, भारताची आध्यात्मिक जाणीव, शिक्षणाचे सक्षमीकरण आणि मानवतेची सेवा या संकल्पानुसार कार्य करत आहे. बंगालमध्ये १९७८ मध्ये जेव्हा पुराने थैमान घातले होते, तेव्हा रामकृष्ण मिशनने आपल्या निःस्वार्थ सेवेने सर्वांची मने जिंकली होती. माझ्या स्मरणात आहे की, ज्यावेळी २००१ ला कच्छमध्ये मोठा भूकंप झाला होता, त्यावेळी मला सर्वात आधी दूरध्वनी करणाऱ्यांमध्ये स्वामी आत्मास्थानंदजी एक होते. त्यांनी मला सांगितले की, या संकट काळात आपत्ती व्यवस्थापन कार्यात रामकृष्ण मिशन आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करायला तयार आहेत. त्यांच्या निर्देशांप्रमाणे रामकृष्ण मिशनने भूकंपाच्या त्या संकटात लोकांची खूप मदत केली.

गेल्या काही वर्षांत, स्वामी आत्मास्थानंद जी आणि स्वामी स्मरणानंद जी यांनी विविध पदे भूषवताना सामाजिक सक्षमीकरणावर मोठा भर दिला. ज्यांना या महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनासंदर्भात माहिती आहे, त्यांच्या नक्कीच स्मरणात असेल की यांच्यासारखे संत आधुनिक शिक्षण, कौशल्य आणि महिला सक्षमीकरणासाठी किती गंभीर असत.

स्वामी आत्मास्थानंद जी यांच्या महान व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्याने मला सर्वाधिक प्रभावित केले ते म्हणजे, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक परंपरेबद्दल त्यांना असणारे प्रेम आणि आदर हे आहे. याचे कारण असे की, त्यांनी भारताच्या विविध भागांत बराच काळ व्यतीत केला आणि ते सतत प्रवास करत असत. गुजरातमध्ये राहून ते गुजराती बोलायला शिकले. माझ्याशी देखील ते केवळ गुजरातीमध्येच बोलत असत. मला त्यांची गुजराती पण खूप आवडत असे.

भारताच्या विकासाच्या प्रवासात अनेक टप्प्यांवर, आपल्या मातृभूमीला स्वामी आत्मास्थानंद जी, स्वामी स्मरणानंद जी यांसारख्या अनेक साधुसंतांचा आशीर्वाद लाभला असून याने आपल्याला सामाजिक परिवर्तनाची नवी चेतना दिली आहे. या संतांनी आपल्याला समाजहितासाठी एकत्र काम करण्याची दीक्षा दिली आहे. ही तत्त्वे आजपर्यंत शाश्वत आहेत आणि येणाऱ्या काळात हेच विचार विकसित भारताची आणि अमृतकाळाची संकल्पशक्ती बनतील. पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या वतीने मी या महान संतांना श्रद्धांजली अर्पण करतो. मला विश्वास आहे की, रामकृष्ण मिशनशी संबंधित सर्व लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे वाटचाल करतील आणि हा मार्ग अधिक प्रशस्त करतील. ओम शांती!

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

8 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

8 hours ago