सातारा : विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा मतदारसंघात या गोष्टीमुळे मोठे वळण आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळत आहे. सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नावाची चर्चा होती. श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय सारंग पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. श्रीनिवास पाटील यांचा सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असा प्रस्तावही मांडला होता. मात्र तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलं आहे.
पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. उमेदवार कोण असावा? याबाबत ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत निर्णय घेणार आहेत. आता सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील उभे राहिल्यास त्यांचं काम करु अन्यथा शरद पवारांनी इथून उभं राहावं अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणूका तोंडावर आलेल्या असताना श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी घेतलेली माघार शरद पवारांसाठी धक्का ठरली आहे. यापुढे शरद पवार सातारा मतदारसंघासाठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.