Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीपोपटांचे बस तिकीट चक्क ४४४ रुपये! पोपटांसोबतचा बसप्रवास आजीला पडला महाग

पोपटांचे बस तिकीट चक्क ४४४ रुपये! पोपटांसोबतचा बसप्रवास आजीला पडला महाग

बंगळुरु : आजकाल अनेकजणांच्या घरात त्यांच्या आवडीनुसार प्राणी, पक्षी पाळले जातात. पाळीव प्राणी किंवा पक्ष्यांचे पालकत्व स्वीकारुन कुटुंबाचा हिस्सा बनवतात. लोकांना प्राण्यांची योग्य काळजी घेणे तसेच त्यांच्यासोबत प्रवास कसा करावा? असा प्रश्न असतो. आज सोशल मीडियावर अशीच एक गमतीदार पोस्ट व्हायरल होत आहे. एक आजी आणि तिच्या नातीला त्यांच्या पोपटांना घेऊन बसमधून प्रवास करणं महागात पडलं आहे.

एक आजी आणि तिची नात बंगळुरुहून म्हैसूर प्रवासासाठी बसमध्ये चढली. कर्नाटक सरकारच्या शक्ती योजने अंतर्गत मोफत बस प्रवासासाठी पात्र असल्याने त्यांना तिकीट खरेदी करण्याची गरज नव्हती. परंतु, बस कंडक्टरने महिला आणि तिच्या नातीबरोबर पिंजऱ्यात असणाऱ्या चार पोपटांना पाहिलं तेव्हा मात्र कंडक्टरने पोपटांचे तिकीट आकारण्याचा निर्णय घेतला. कंडक्टरने प्रत्येक पोपटाचे १११ रुपये म्हणजेच चार पोपटांचे ४४४ रुपयांचे प्रवाशाला तिकीट काढावे लागले. या घटनेमुळे इतर प्रवाशांचाही गोंधळ उडाला. अशी गमतीशीर पोस्ट बसमधील एका प्रवाशाने त्याच्या कॅमेरामध्ये कैद करुन सोशल मीडियावर @TeluguScribe या अकाउंटवरून शेअर केले आहे.

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ शहर, उपनगर आणि ग्रामीण मार्गांसह नॉन-एसी बसेसमध्ये पाळीव प्राण्यांबरोबर प्रवास करण्याची परवानगी देतात. याव्यतिरिक्त कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) अधिकाऱ्यांनी असा इशाराही दिला आहे की, जे प्रवासी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी तिकीट काढत नाहीत त्यांना प्रवासाच्या तिकीट किमतीच्या १० टक्के दंड आकारला जातो. तसेच जर कंडक्टर पाळीव प्राण्यांसाठी अर्ध (Half) तिकिटे देत नसतील, तर त्यांच्यावर फिर्याद दाखल केली जाऊ शकते आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ निधीच्या गैरवापरासाठी त्यांना स्थगितदेखील केले जाऊ शकते. त्यामुळे कंडक्टरने महिलेला या चार पोपटांचे तिकीट काढण्यास सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -