बिल गेटस यांच्यासमवेत आधुनिक तंत्रज्ञानावरील चर्चेत पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स (Bill Gates) यांच्यासोबत चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधानांनी आजच्या काळात एआयच्या (Artificial Intelligence) वापराबद्दल भरपूर गप्पा मारल्या. भारतातील मुलं बोलायला लागताच ‘एआय’ (AI) म्हणतात, असंही मोदी मिश्किलपणे म्हणाले.
“भारतातील कित्येक भाषांमध्ये जन्मदात्रीला ‘आई’ म्हटलं जातं. लहान मुलांचा पहिला शब्द बहुतांश वेळा आई हाच असतो. मात्र आजकालच्या मुलांचा पहिला शब्द ‘एआई’ ठरत आहे.. हा केवळ विनोद आहे. मात्र, खरंच आई आणि एआय हे ऐकायला एकसारखंच वाटतं”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सामान्यांपर्यंत पोहोचलं एआय
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की भारतातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत देखील आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पोहोचलं आहे. “G20 शिखर परिषदेवेळी मी भाषांतरासाठी एआयचा वापर केला. यावेळी माझ्या सर्व चालकांनी एआय अॅप्स डाऊनलोड केले होते, ज्या माध्यमातून ते विविध देशांमधून आलेल्या व्हीआयपी पाहुण्यांशी संवाद साधू शकत होते.” असं त्यांनी सांगितलं.
#WATCH | PM Narendra Modi and Bill Gates discuss how India sees AI. They also discuss Deepfake.
PM says, “If we use AI as a magic tool, it will perhaps lead to a grave injustice. If AI is relied on out of laziness…then it is the wrong path. I should have a competition with… pic.twitter.com/M8l5tt66tx
— ANI (@ANI) March 29, 2024
एआयचा गैरवापर टाळणं गरजेचं
यावेळी पंतप्रधानांनी एआयच्या गैरवापराबद्दल चिंताही व्यक्त केली. ते म्हणाले की योग्य प्रशिक्षण न देता एखाद्या व्यक्तीच्या हातात एआय दिल्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. एआय-जनरेटेड कंटेंटवर क्लिअर वॉटरमार्क देणं गरजेचं आहे. म्हणजे सामान्यांनाही तो कंटेंट एआय जनरेटेड आहे हे समजेल आणि त्याचा गैरवापर टळेल. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात कोणीही डीपफेक वापरू शकतो. त्यामुळे असा कंटेंट ओळखता येणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.