जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
परमेश्वराला कोण ओळखतो?
अरे अर्जुना मी तो कैसा, मुखाप्रती भानू जैसा
परि या प्राणियांचे दैव कैंचे, ते मज नोळखती…
ते मला ओळखतच नाही. ओळखत नाहीत म्हणून तर सर्व समस्या आहेत. ते जर ओळखतील, तर हा भेदाभेद कशाला असेल. त्याचे शरीर पंचमहाभूतांचे, माझे शरीर पंचमहाभूतांचे. त्याचा प्राण आहे, माझाही प्राण आहे. त्याचे मन आहे, माझेही मन आहे. त्याचे अंतर्मन आहे, तसेच माझेही अंतर्मन आहे. त्याचे रक्त तांबडे आहे व माझेही रक्त तांबडेच आहे. असे होत नाही की माझे रक्त हिरवे व त्याचे रक्त तांबडे. झेंडा हिरव्या रंगाचा असू शकतो पण सगळ्यांचे रक्त हे तांबडे असते. लोक हेच विसरतात. मी नेहमी सांगतो, पूर्ण चेहरा झाकून टाकायचा व कुठल्याही बाईने आपला नवरा ओळखून दाखवायचा. ती कशी शोधून काढणार? चेहऱ्याच्या ठिकाणी हा व्यवस्थेचा भाग आहे.
परमेश्वराने ही व्यवस्था केली म्हणून चेहऱ्यावरून माणसाला ओळखता येते. ही व्यवस्था का केली? जीवन चालण्यासाठी, जग चालण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. दिसायला सगळे सारखे असते, तर प्रलय होईल. कोणालाच कोणी ओळखता येणार नाही. पण परमेश्वराने ही व्यवस्था केली. प्रत्येकाला नाक आहे, पण प्रत्येकाचे नाक वेगळे. प्रत्येकाला डोळे आहेत, पण प्रत्येकाचे डोळे वेगळे. डोळ्यांवरून पोलीस बरोबर ओळखतात की हा चोर आहे की राव आहे. आधार कार्ड काढताना डोळ्यांचे चित्र घेतले जाते. चेहऱ्याचे चित्र घेतातच मात्र डोळ्यांचे चित्र घेतलेच जाते कारण डोळ्यांवरून माणसाला ओळखता येते. नाक, डोळे, कान, केस, चालणे, बोलणे, स्वभाव अस सर्व काही वेगळं, कुठेही साम्य नाही. माणूस असला तरी प्रत्येकजण वेगळा. लांडगा हा लांडगा आहे, तर कोल्हा हा कोल्हा आहे. मी या संदर्भात नेहमी सांगत असतो की, डार्विनचा सिद्धांत जो आहे, की माकडापासून माणूस निर्माण झाला तो मनाला पटत नाही, कारण परमेश्वरी व्यवस्थेचा भाग समजून घेतला तर लांडग्याला लांडगेच होणार, तसेच माकडाला माकडेच होणार. इतकी माकडे आहेत आज, एकतरी माकड माणूस झालेलं दिसतो का? माकडापासून माणूस झालेला आत्तापर्यंत कोणाला ठाऊक नाही. माकडे ही माकडेच असणार हा व्यवस्थेचा भाग आहे.
डार्विनचा हा जो सिद्धांत आहे, यात आम्हाला असे वाटते की असे होणे शक्य नाही. परमेश्वरी व्यवस्थेचा भाग पाहिला, तर माणसाला माणूसच होणार. सीताफळाच्या झाडाला सीताफळ आणि पेरूच्या झाडाला पेरूच येणार. हा परमेश्वरी व्यवस्थेचा भाग आहे. दुसरा एक समज असा आहे की स्फोट झाला व जग निर्माण झाले हे देखील आम्हाला पटत नाही. स्फोटातून व्यवस्था निर्माण होत नाही तर, अव्यवस्था निर्माण होते. कुठेही स्फोट झाला, तर बघा, माणूस म्हणून जी व्यवस्था होती ती नाहीशी होते. माणसे, पशु-पक्षी मारतात, सगळे बिघडून जाते. म्हणूनच स्फोट झाला व हे जग निर्माण झाले हे आम्हाला पटतच नाही. कारण का? तुम्ही जर विश्वाकडे पाहिले, जगाकडे पाहिले, तर त्या ठिकाणची व्यवस्था ही दिव्य आहे, अलौकिक आहे. कल्पनेच्याही पलीकडे ही व्यवस्था आहे. व्यवस्था स्फोटातून होणे शक्यच नाही. व्यवस्था होते ती ज्ञानातून होते व ज्ञान हे दिव्य ज्ञान असते.