राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार जोमाने काम करत आहे. दुसऱ्या बाजूला दोन राजकीय पक्षांतील शिल्लक राहिलेल्या गटांना घेऊन काँग्रेस आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४८ पैकी एका जागेवर विजय मिळविता आला होता. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत आपल्या पक्षाला अधिक जागेवर यश मिळेल या भाबड्या आशेवर सध्या काँग्रेस बसला आहे. त्यात आता उबाठा सेनेने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमधील नेत्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडी धर्म पाळायला हवा होता, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीची सत्ता असताना मातोश्रीवर राज्याचा कारभार चालविणारे ठाकरे यांच्याबद्दल त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही नाराजी होती. मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांना भेट मिळणे ही त्याकाळी मोठी अवघड गोष्ट होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार ज्या तडफेने लोकहिताची कामे घेऊन पुढे जात आहे, त्याला रोखण्यासाठी काँग्रेसपुढे तुटलेल्या दोन पक्षांना साथ घेण्यावाचून पर्याय नाही. ठाकरे गटाने बुधवारी लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. त्यात महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना विश्वासात घेतले नाही, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले. ठाकरे यांनी जाहीर केलेली यादी इतकी जिव्हारी लागली की, काँग्रेसमध्ये अत्यंत संयमी नेते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या जाहीर झालेल्या यादीत सांगलीची जागा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करणे किंवा धारावीतला मतदारसंघ जाहीर करणे योग्य नाही. कारण आमची अजून चर्चा सुरू आहे. आमची आघाडी आहे.
आघाडी धर्म हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. दुर्दैवाने आमच्या मित्रांनी ती काळजी घेतलेली नाही हे दिसते आहे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ‘तीन पक्ष मिळून निर्णय घ्यायचा असतो. चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणे हे आघाडी धर्माला गालबोट लावणे आहे.’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघावर दावा करणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळा करणाऱ्या उबाठा सेनेच्या अमोल कीर्तिकरांचा प्रचार करणार नाही असे सांगून टाकले. मुंबईतून काँग्रेस संपवली जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
ईशान्य मुंबईमध्ये ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या उमेदवारीविरोधात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केल्याने या मतदारसंघातही आघाडीत बिघाडी झाल्याचे लपून राहिलेले नाही. सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘मशाल नाही विशाल’ असा मेसेज फिरू लागला. काँग्रेसकडून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यामुळे आता पाटील यांच्यासह आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत धाव घेतली.
पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास सांगलीत आघाडीत लढत होण्याची शक्यता आहे. बरे झाले निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांचा मूळ स्वभाव समजला. त्यामुळेच आघाडीचा धर्म पाळला नाही, असे काँग्रेस नेत्यांना आता वाटू लागले आहे. याआधी भाजपासोबत असलेली युती तोडून उद्धव ठाकरे यांनी आपल्या अविश्वासू गुणांचा पैलू जनतेसमोर आणला होता. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६ जागा जिंकता आल्या, त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा करिश्मा होता, हे मान्यच करावे लागेल. तरीही, गुप्त बैठकीत दिलेल्या वचनांचा आधार घेत, उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत काडीमोड घेतला.
महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-शिवसेनेला जनाधार दिला असतानाही, विरोधी पक्षांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले होते. त्यामुळे मित्रधर्म, आघाडी धर्म यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांना सोयरसुतक नाही. मिळालेल्या संधीचा फायदा उठविण्याचा राजकीय डाव ते नेहमीच खेळतात, याची जाणीव आता काँग्रेसवाल्यांनाही झाली असेल. जो अनुभव काँग्रेसवाल्यांना आज आला असेल तोच अनुभव वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही आला आहे. त्यामुळे त्यांनी उबाठा सेनेसोबत केलेली युती संपुष्टात आल्याचे जाहीर करून टाकले.
प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगत दीड वर्षांपूर्वी केलेली युती ठाकरेंना टिकवता आली नाही. खरंतर मुख्यमंत्री पदावर असताना स्वत:च्या पक्षाचे ४० आमदार आणि १३ खासदार सोडून गेले तेव्हा त्यांना गद्दार बोलून हिणवण्यात आले होते. आपल्यावर कसा अन्याय झाला हे दाखवण्याचा प्रयत्न करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न झाला. याच सहानुभूतीवर स्वार होऊन निवडणुकीत काही करिष्मा होईल या आशेवर उबाठा सेना बसली आहे. कारण मित्र पक्षांना गृहीत धरण्याचा प्रयत्न आता जनतेच्या लक्षात आला आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…