
गोविंदाच्या पक्षप्रवेशापूर्वीच पोहोचल्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर...
मुंबई : बॉलिवूडचे सेलिब्रिटी (Bollywood celebrities) सध्या राजकारणात रस घेताना दिसून येत आहेत. इनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असतात. कंगना रानौतनेही नुकतीच राजकारणात एन्ट्री करत भाजपाकडून लोकसभेचं तिकीट देखील मिळवलं आहे. तर अभिनेता गोविंदाने (Govinda) देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknanth Shinde) यांच्या शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हा सोहळा पार पडला. मात्र, यामध्ये चर्चा रंगली ती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अचानक आलेल्या कपूर बहिणींची. करिना कपूर (Kareena Kapoor) आणि करिष्मा कपूर (Karishma Kapoor) यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे येत्या काळात त्याही राजकारण करताना दिसणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा राजकारणात पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आज गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी (North West Lok Sabha Constituency) गोविदांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे गोविंदाला उमेदवारी दिल्यास अमोल किर्तीकर विरोधात त्याची लढत होईल.
दरम्यान, करिष्मा कपूर आणि करिना कपूर या दोन अभिनेत्रीदेखील वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या. या दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर गोविंदाच्या पक्ष प्रवेशाआधीच दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले. तर, दुसरीकडे या दोघी राजकारणात प्रवेशासाठी आल्या की काही कामानिमित्त आल्या याचीदेखील चर्चा सुरू झाली आहे.
कपूर कुटुंबीयांकडून या आधी राजकीय-सामाजिक मुद्यावर फार क्वचित भाष्य करण्यात आले आहे. राजकारणातही या कुटुंबातील कोणताही सदस्य आला नाही. त्यामुळे आता थेट अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.