
राहत्या घरातच झाला अपघात...नेमकं काय घडलं?
पुणे : राज्याचे सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीला, पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. त्यांना पुण्यातील (Pune) औध येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. पुढील १२ ते ५ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. राहत्या घरातच त्यांना ही दुखापत झाल्याचे समजत आहे.
दिलीप वळसे पाटील अंधारात लाईट सुरु करायला जात होते, त्यावेळी त्यांचा पाय घसरला, ते पडले आणि त्यांना दुखापत झाली. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने पक्षात काहीसं चिंतेचं वातावरण आहे.
काय आहे दिलीप वळसे पाटील यांची पोस्ट?
दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः एक्स पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईन', अशी पोस्ट दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.