माझे कोकण: संतोष वायंगणकर
जगामध्ये दोन महायुद्धं झाली. या नंतरचं होणारं तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल असा अंदाज अनेक जलतज्ज्ञ व्यक्त करताना दिसतात. पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल की होणार नाही हे येणारा काळ ठरवेल; परंतु पाण्यासारखा विषय आपण सर्वांनीच फारच गांभीर्याने घेतला पाहिजे; परंतु आपण कोकणवासीय तसं म्हटलं, तर कोणताच विषय फार गांभीर्याने घेत नाही. याचं कारण आपणाला फार कधी काही सोसावं लागत नाही. लागलं नाही. त्यामुळे जे आहे, त्यात समाधान, फार काही दगदग न करता जे काही मिळतंय ते पुरेसं म्हणत गप्प राहाणं पसंद करतो. दुष्काळ कसा असतो, त्याच्या झळा कशा असतात याची आपणाला कोणतीच माहिती नाही. महाराष्ट्रातील काही भागांत विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रात आजही दुष्काळात होरपळणारी लोकं आहेत.
पाण्यासाठी कशी वणवण करावी लागते आणि दोन-सहा घागर पाणी आणून पायपीट करणारा शेतकरी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहात नाही. या अशा परिस्थितीमुळे पाण्याचं महत्त्व महाराष्ट्रातील अनेक भागांतून अधोरेखित झाले आहे. आपल्या कोकणात दीडशे इंच पाऊस पडतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडतो. मागील तीन वर्षांत पाऊस बाराही महिने पडणार की, काय असं वाटण्यासारखी स्थिती आहे. यातच पाण्याची टंचाई जाणवणार असं वाटत असतानाच कोकणात पाऊस कोसळायला सुरुवात होते. सुदैवाने यामुळे पिण्याच्या पाण्याचं येणार संकट टळतं; परंतु यावेळी देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील बंगलूरु शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
आजच्या क्षणाला बंगलूरु शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. पाणीसाठे कमी होत आहेत. बोअरिंग खोदून पाणी खेचण्याचे काम सुरू आहे; परंतु पाणी अडवण्याचे पाणी साठवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. पूर्वी कोकणातील गावो-गावी शेताला लागून असणाऱ्या ओहोळावर कच्चे बंधारे बांधले जायचे. गावातील प्रत्येक वाडी-वस्तीतून वाहणाऱ्या ओहोळावर हे कच्चे बंधारे ग्रामस्थ श्रमदानाने बांधत असत. अलीकडे हे प्रमाण फारच कमी झाले आहे. शासकीयस्तरावर कच्चे बंधारे बांधण्याचे फोटोसेशन सुरू झाल्यानंतर प्रशासनातील कर्मचारी संघटना फोटोसाठी बंधारा बांधतात; परंतु ग्रामस्थ एकत्र येऊन जे श्रमदान व्हायचे आणि वस्तीत पाणी साठवलं जायचं. त्यामुळे साहजिकच पाणी अडवलं जाण्याचे विहीर आटण्याचे प्रमाण कमी होते; परंतु कोकणातील मध्यम आणि लघू धरणांची कामही पूर्ण झाली पाहिजेत.
आज पाण्याच्या टंचाईकडे जर आपण पाहिलं, तर काही फरक पडणार नाही अशी समजूत करून जर आपण फक्त पाहणार असलो, तर ते पूर्णपणे चुकीच ठरणार आहे. पाण्याचा विषय आपण सर्वांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. पाण्याचे जे सोर्स आहेत ते जपले पाहिजेत. शहरातून जाणाऱ्या नदी किनारी बांधकामांना परवानगी दिली जाता कामा नये. मुंबईत जसे समुद्रात बांधकामं उभी राहात आहेत तसेच कोकणातही वाहत्या नद्यांमध्ये माती टाकून त्या ठिकाणी मोठ्या इमारती उभ्या राहात आहेत. हे सगळं समाजहिताचा विचार करून तत्काळ थांबवलं पाहिजे. कोकणातील नदी-नाले, डोंगर हे सर्व आपण जपलंच पाहिजे. कोकणाचं कोकणपण हे डोंगर-दऱ्या, नदी-नाले, ओहोळ यामध्येच आहे आणि हेच जर आपण नष्ट करणार असलो तर तो आपला करंटेपणा ठरेल. पाणीटंचाईची कारणं ही सगळी यामध्येच आहेत.
आपल्याकडच्या विहिरी कोरड्या पडत आहेत. बोअरिंगचं पाणीही कमी होत आहे. याचा आपण विचार केला पाहिजे. यासाठी कोकणवासीयांनी वेळीच सावध राहिलं पाहिजे. राजकारण आपल्या पद्धतीने आणि दिशेने होत राहिलं; परंतु जर आपण जीवनाशी निगडित आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या पाणी या विषयाकडे दुर्लक्ष करत असलो, तर काळ आपणाला माफ करणार नाही. कवठेमहांकाळचे त्यावेळचे आमदार अजितराव घोरपडे (सरकार) हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना असेच कणकवलीच्या गेस्ट हाऊसला पत्रकार परिषदेनिमित्त त्यांनी भेट दिली होती. जून महिना होता. जोरदार पाऊस सुरू होता. बाहेरील पाऊस पाहून आम्ही सहज म्हणू हा आता कधी थांबणार असं म्हटलं, यावर घोरपडे सरकार म्हणाले, नाही ओ असं म्हणू नका. माझ्या भागात लोक पावसाची वाट बघत असतात. माझा दुष्काळी भाग एकदा बघा तरी एकदा. मी कवठेमहांकाळ, आटपाटी या भागात फिरून आलोयं.
जुलै महिन्यात आकाशात, एखादा ढग जरी दिसला तरीही शेतकरी पाऊस येईल म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसतो. त्या भागात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष असतं. त्यावेळी ताकारी धरणातून पाणी वळवण्याचं काम हाती घेतलं होतं. यामुळे दुष्काळ काय असतो, हे पाहिल्यावर आपल्याला अस्वस्थ व्हायला होईल. आपण फक्त सावधानता बाळगली तरीही आपलं निसर्गाने दिलेलं वैभव, सृष्टीचं सौंदर्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करीत पाण्याची टंचाईच भासणार नाही. एवढं तरी आपण करू शकू ना!