Sunday, July 14, 2024

व्यवहार – भान

व्यासमुनींनी जगण्याचं सुंदर तत्त्वज्ञान गीतेत साररूपाने सांगितले आहे. सत्त्व, रज आणि तम या तीन प्रवृत्तींतून निर्माण होणारे तीन प्रकारचे यज्ञ होय. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेला यज्ञ तो सात्त्विक होय. तसेच ‘फलाची इच्छा धरून दंभासाठी केलेल्या यज्ञाला ‘राजस यज्ञ’ म्हणतात, असं गीतेत सांगितलं आहे.

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

व्यासमुनींनी गीतेत साररूपाने सांगितलं आहे जगण्याचं सुंदर तत्त्वज्ञान! आजच्या भाषेत जीवन जगण्याची कला (Art of Living). हे सार मराठीतून मांडताना ज्ञानदेव त्याला देतात प्रतिभास्पर्श! त्यामुळे ज्ञानेश्वरी ही एक सुंदर यात्रा होते. यात अर्जुनाच्या जोडीने आपणही अधिक जाणते, संपन्न होत जातो. यात मोठा वाटा माऊलींच्या दृष्टांताचा आहे. सहज, सोपे, समर्पक दाखले हे तर त्यांचं वैशिष्ट्य!

आज आपण पाहूया सतराव्या अध्यायातील असे आगळे दाखले. सत्त्व, रज आणि तम या तीन प्रवृत्ती. त्यातून निर्माण होणारे तीन प्रकारचे यज्ञ. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेला यज्ञ तो सात्त्विक होय. तर ‘फलाची इच्छा धरून दंभासाठी केलेला जो यज्ञ, त्याला ‘राजस यज्ञ’ म्हणतात, असं गीतेत सांगितलं आहे. हे समजावताना माऊलींनी दिलेला दाखला असा- हा राजस यज्ञ कसा करतात? तर श्राद्ध तिथीच्या दिवशी राजास सहज मेजवानीला बोलवावे. त्याप्रमाणे (कारण) जर राजा आपल्या घरी भोजनाला आला, तर त्यापासून आपल्यास पुष्कळ उपयोग होऊन आपला लौकिकही होईल आणि श्राद्धही थांबणार नाही. (ते तर पार पडेलच. कामात कामही होऊन जाईल!)

ही ओवी अशी-
‘जरि राजा घरासि ये।
तरी बहुत उपेगा जाये।
आणि कीर्तिही होये। श्राद्ध न ठके॥’

ओवी क्र. १८६
मानवी स्वभावाचं, व्यवहाराचं किती सखोल, सूक्ष्म ज्ञान माऊलींना आहे पाहा! सात्त्विक आणि राजस यज्ञ करण्याची क्रिया आणि विधी एकच, पण फरक कुठे पडतो? तर हेतूमध्ये. सात्त्विक यज्ञात कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. याउलट आहे ‘राजस यज्ञ. यात आहे फळाची अपेक्षा. ही अपेक्षा ज्ञानदेवांनी या उदाहरणातून किती नेमकेपणाने स्पष्ट
केली आहे ना!

श्राद्ध करायचं आहे म्हणजे आपल्या पितरांची आठवण ठेवायची, त्यांना संतुष्ट करायचं आहे, मग त्यात संधी साधून राजाला बोलवायचं. का? कारण पितरांसाठी मिष्टान्न असणार, मग राजासाठी वेगळी तयारी करायला नको. पुन्हा राजा म्हणजे सत्तेचं केंद्र. म्हणून सत्ताधारी आला की त्याचा पुष्कळ उपयोग करून घेता येईल. स्वतःची अनेक कामं साधता येतील. पुन्हा ‘अरे, यांच्याकडे राजा आला. मोठी असामी आहे बरं का!’ अशी लौकिकात भर पडेल. पुन्हा श्राद्ध तर होऊनच जाईल.

अशा प्रकारच्या मनोवृत्तीने केलेला यज्ञ तो राजस यज्ञ. यज्ञ हा शब्द आपण व्यापक अर्थाने घेऊया. यज्ञ म्हणजे कोणतंही चांगलं कर्म. ते करताना अशी सकाम वृत्ती ठेवली की तो ‘राजस यज्ञ’ झाला. या उदाहरणातून कळतं की, ज्ञानदेव माणसाची वृत्ती, स्वभाव, कंगोरे किती ओळखतात! वरकरणी एक चांगली कृती करणं, पण आत हेतू स्वार्थी असणं. ही माणसाची वृत्ती यात नेमकी दाखवली आहे, म्हणून हा दाखला सहज समजतो.

‘राजस यज्ञा’चा हा दाखला आपण वाचतो. आपल्याला कळतं ‘असं वागू नका’ असं ज्ञानदेव यातून सांगतात. ते आपल्याला उपयोगी आहेच, पण आपल्या भोवताली, समाजात अशी वागणारी माणसं असतील. त्यांना समजून घ्यायलाही हा दृष्टांत आपल्याला दिशा देतो. त्यामुळे अशा माणसांपासून आपण सावध होऊ शकतो, दूर राहू शकतो.

ही आहे ज्ञानदेवांची उक्ती…
सांग जीवनाची युक्ती…

manisharaorane196@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -