
तब्बल ३४ वर्षांनी दिसणार 'या' भूमिकेत
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील माहेरची साडी हा सर्वात गाजलेला चित्रपट अजूनही लोकांच्या मनात घर करुन बसला आहे. यातील गाणी आजही मराठी रसिकांच्या ओठांवर आहेत. मराठी सिनेमांत सर्वात उच्चांक स्थानवर असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांनी एक मोठी घोषणा केली आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते नवाकोरा चित्रपट घेऊन येणार आहेत. माहेरची साडी नंतर तब्बल ३४ वर्षांनी विजय कोंडके पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला सर्वांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.
नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली विजय कोंडके जाणून आहेत. त्याच धर्तीवर ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विजय कोंडके काय म्हणाले?
निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याची इच्छा त्यांच्या मनात आली. दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचललं. या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी ‘लेक असावी तर अशी’ हा नवा मराठी चित्रपट मी २६ एप्रिलला घेऊन येतोय, असं विजय कोंडके यांनी म्हटलं. त्यामुळे हा नवा चित्रपट काय धमाल आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.