उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये उबाठा गटाकडून मुंबईतील उमेदवार घोषित केले आहेत. उबाठा गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्यामुळे महाविकास आघाडीत भांडणतंटेला सुरवात झाली आहे. अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेते संजय निरुपम प्रचंड आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेतृत्व उबाठा गटाला सरेंडर झालं असून, आता माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असतील. आठवड्याभरात मी मोठी घोषणा करू शकतो, आता आरपारची वेळ आली असल्याचे निरुपम यांनी सांगितले.
मुंबईतील सहा पैकी पाच ठिकाणी उबाठा गट लढणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेस पार्टीला खड्ड्यात घालण्याचे काम केले जात असून काँग्रेस पार्टीतून निगोशिएशन करणाऱ्या उबाठा गटाचा निषेध करतो. उबाठा गटाने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी खिचडी सप्लायरकडून दलाली घेतली आहे. अशा उमेदवाराला आमच्यावर थोपवलं आहे. मी खिचडी चोराचं काम करणार नाही, यासंदर्भात मी आत्ताच घोषणा करतोय, असे निरुपम म्हणाले.
न्यायाच्या गप्पा मारणारे आपल्याच कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहेत. त्यांना मागील दहा दिवसात कोणीही फोन केला नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत न्याय होत नाही असे निरुपम यांनी सांगितले. याबाबत उबाठा गटाला जाब विचारायला हवा असा निरुपम यांनी वरिष्ठ नेत्यांना आग्रह केला. तसेच मी माझ्या नेतृत्वाला सांगू इच्छितो, माझ्याकडील सर्व पर्याय खुले असतील. एका आठवड्याहून अधिक वेळ मी नाही देऊ शकत. टफ निगोशिएटर आमचं नेतृत्व नव्हतं हे स्पष्ट दिसत आहे. आमच्या नेतृत्वाचं हे अपयश आहे हे मी मान्य करतोय. काँग्रेसला वाचवण्यात मुंबईतून आम्ही अपयशी झालोय हे दिसून येत आहे. सांगलीची जागा त्यांनी घोषणा केली यावरुन स्पष्ट दिसतंय की काँग्रेसची त्यांना गरज नाही, असं निरुपम म्हणाले.
काँग्रेस संपवण्याचा उबाठा गटाचा विचार
उबाठा गट एकट्याच्या दमावर लढू शकत नसल्याने काँग्रेसच्या सीट ओढून घेतल्या आहेत. उबाठा गटाचा काँग्रेस संपवण्याचा विचार असेल. प्रकाश आंबेडकर वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली. मात्र चर्चेवेळी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं दिसून येत आहे. एका आठवड्यानंतर काय होणार हे तुम्हाला कळणारच आहे. मुंबईत एकावेळी पाच खासदार काँग्रेसचे असायचे. पण आता काँग्रेसचा मतदार जाणार कुठे? उबाठा गटाकडे जाणार? या गोष्टीचा निरुपम यांना संभ्रम आहे. मी आवाहन करतोय तेव्हा माझे कार्यकर्तेही अमोल किर्तीकरचा प्रचार करणार नसल्याचे निरुपमांनी म्हणाले.
पार्टीला वाचवायचं असेल तर युती तोडा आणि मैदानात जाऊ
मायग्रेट लेबर हा काँग्रेसचा मतदार आहे. त्यांच्या आयुष्यासोबत जो व्यक्ती खेळला आहे त्यांना मतदारदेखील मतदान करणार नाही. उबाठा गट आणि काँग्रेसच्या युतीला मी आधीच विरोध केला होता. आता पाच वर्षांनंतर तेच दिसतंय. मात्र, आमचे काही नेते होते त्यांना सत्तेची मलाई खायची होती आणि हे घडलं. पार्टीला वाचवायचं असेल तर युती तोडा आणि मैदानात जाऊयात असेही निरुपम म्हणाले.