
ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद आले चव्हाट्यावर
रामटेक : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन ठाकरे गट (Thackeray Group) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसला विचारात न घेता ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील आणि दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये आधीच नाराजीचं वातावरण असताना आणखी एका गोष्टीमुळे मविआतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. रामटेकची (Ramtek) जागा ठाकरे गटाने काँग्रेसला दिल्यामुळे उबाठाच्या सुरेश साखरे (Suresh Sakhre) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आहे.
रामटेकमधून काँग्रेसने रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देत ठाकरे गटाच्या सुरेश साखरे यांनी या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. सुरेश साखरे हे ठाकरे गटाचे विदर्भ संघटक म्हणून काम करत होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर साखरे म्हणाले की, हक्कासाठी अर्ज भरला म्हणून कुणी बंडखोरी म्हणत असेल तर ती मान्य आहे. आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्हाला वरून कुणी आदेश दिले नाहीत. वरिष्ठांनी संपर्क साधला नाही. त्यामुळे शिवसैनिकांच्या आग्रहाखातर हा उमेदवारी अर्ज दाखल केला असं त्यांनी सांगितलं. त्याचसोबत अर्ज मागे घेणार नाही असं साखरेंनी स्पष्ट केलं.
ठाकरे गटाच्या बंडखोरीवर रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, माझी जनता माझ्या पाठिशी आहे. गोरगरीब जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कुणी हरवू शकत नाही. आज महाविकास आघाडीने मला तिकीट दिलं असून जनतेच्या जोरावर मी संसदेत जाणार आहे. मविआचे सर्व नेते माझ्या पाठिशी ताकदीने उभे आहेत. तळागाळात काम करणारा उमेदवार दिला असून त्या उमेदवाराच्या पाठीशी मविआ नेते आहेत असं रश्मी बर्वे म्हणाल्या. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे सुरेश साखरे यांना टोला लगावला आहे.
काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद
ठाकरे गटाने आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत दोन जागांवर महाविकास आघाडीत चर्चा होत असताना उमेदवार जाहीर केले. त्याबाबत काँग्रेस नेते प्रचंड नाराज झाले. उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा, आघाडी धर्म पाळावा अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली. 'तर आता चर्चा आमच्या दृष्टीने थांबली आहे, आणखी किती चर्चा करायची?' असा प्रतिसवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला. त्यामुळे जागावाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.