
सांगलीच्या जागेवरुन मविआमध्ये वादाची ठिणगी; बाळासाहेब थोरातांनीही व्यक्त केली नाराजी
मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन खटके उडत असल्याचे समोर येत आहेत. त्यातच मविआच्या इतर घटक पक्षांना विचारात न घेता ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मविआच्या दोन्ही पक्षांतील वा चव्हाट्यावर आले. त्यातच आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेने युती धर्म पाळला पाहिजे आणि फेरविचार केला पाहिजे, असं ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेची घोषणा केली त्याबद्दल आमच्या सर्वांची नाराजी आहे. युती आघाडीचा धर्म पाळला पाहिजे यावर त्यांनी विचार केला पाहिजे होता. आता पुन्हा फेरविचार केला पाहिजे. भिवंडी, सांगली या पारंपारिक आमच्या जागा आहेत. मुंबईत एक जागा दिलेली आहे. आणखी एक जागा द्यावा आमची अपेक्षा आहे. मात्र तसं न करता त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यांनी काळजी घेणे आवश्यक होतं. ती त्यांनी घेतली नाही. या जागांवरती आम्ही आणि आमचे कार्यकर्ते अजूनही ठाम आहोत. दिल्लीतील आमचे नेतेही यावरती आग्रही आहेत. सांगलीची जागा ही वसंतदादा पाटील यांच्यापासून राहिलेली आहे. या जागा सोडणे आम्हाला खूप वेदनादायी आहेत त्यामुळे याचा फेरविचार झाला पाहिजे. सांगली, भिवंडी आणि मध्य मुंबई यासाठी अजूनही आम्ही आग्रही आहे आणि प्रयत्न करत आहोत त्यांनी फेरविचार करावा, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
आघाडी धर्माला गालबोट : विजय वडेट्टीवार
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही उद्धव ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची जागावाटप चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले. उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित केल्याने आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा, असं वडेट्टीवार म्हणाले.